आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेक्यावर पिस्तूलने वार करून मिरचीपूड फवारली, मदतीसाठी धावलेल्या दाेघांना ठार मारण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील मेहरूण तलाव परिसरात 'माॅर्निंग वाॅक'साठी गेलेल्या वृद्ध व्यापाऱ्याच्या डोक्यावर दराेडेखाेरांनी गावठी पिस्तूलचे बट मारुन जखमी केले. त्यानंतर त्यांच्या डाेळ्यात मिरचीपुडचा स्प्रे फवारून खिशातील २ हजारांची राेकड व चारचाकीची किल्ली हिसकावली.याच चारचाकीने एकाने तर दुसऱ्याने स्वत:च्या दुचाकीने पाेबारा केला. साेमवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली. या वृद्धाच्या मदतीसाठी धावलेल्या दाेघांवरही दराेडेखाेरांनी पिस्तूल राेखून ठार मारण्याची धमकी दिली. दीड मिनिटांच्या या थरारक घटनेने माॅर्निंग वाॅकसाठी या भागात येणारे नागरिक प्रचंड हादरले. 


नरेंद्र बहादूरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्शनगर) असे लुटमार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ठाकूर हे व्यापारी असून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २० वर्षांपासून ते नियमित मेहरूण तलाव परिसरात 'मॉर्निंग वॉक'साठी येतात. सोमवारी सकाळी ते चारचाकीने (एमएच १९ बीयू ३७६५) मेहरूण तलाव येथे पोहचले. सहकारी सुभाष तोतला व जगन्नाथ महाजन सोबत होते. ठाकूर हे चारचाकी पार्किंग करण्यासाठी पुढे गेले. तेवढ्याच वेळात तोतला व महाजन हे दोघे त्यांच्यापासून ५० फूट अंतर पुढे निघून गेले होते. ठाकूर हे चारचाकीजवळ उभे असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन दरोडेखोर आले. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. दोघांनी काळे कपडे परिधान केले होते. ठाकूर यांच्याजवळ दुचाकी उभी करून 'गाडी की चाबी दे,' अशी दादागिरीची भाषा त्यांनी वापरली. ठाकूर यांनी विरोध करताच त्यातील एकाने खिशातून गावठी पिस्तूल काढून त्याचे बट ठाकूर यांच्या डोक्यात मारला. यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तर दुसऱ्या दरोडेखोराने डोळ्यावर मिरचीपुड असलेला स्प्रे फवारला. 


डाेळ्यांची जळजळ झाल्याने ठाकूर भेदरले. त्यांनी आरोळ्या मारण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून पुढे चालत असलेले महाजन व तोतला यांनी पाठीमागे वळून त्यांच्या मदतीसाठी धावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून दरोडेखोराने त्यांंच्या दिशेला गावठी पिस्तूल रोखून गाेळी झाडण्याची धमकी दिली. त्यामुळे महाजन दचकले. त्यांनी ठाकूर यांना आवाज देऊन चारचाकीची किल्ली देण्याचे सांगितले.


यांनी पाहिली ही थरारक घटना 
ठाकूर यांच्या डोळ्यावर मिरचीपुड असलेला स्प्रे मारला होता. त्यामुळे त्यांच्या सफेद कुर्त्यावर पिवळा रंग लागला होता. ठाकूूर यांनी आरडा-ओरड केल्यानंतर महाजन व तोतला यांनी पाठीमागे वळून पाहिले होते. ठाकूर यांच्या मित्रांनी गंमत म्हणून त्यांच्या अंगावर रंग टाकला असेल, असे महाजन यांना वाटले. पण ठाकूर व दरोडेखोरांत झटापट वाढल्यानंतर त्यांना गैरप्रकार होत असल्याची कल्पना आली. त्यानुसार ते ठाकूर यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले होते. मात्र, दराेडेखाेरांनी पिस्तुल राेखून ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. 


पाचोऱ्याच्या दिशेने पलायन 
ठाकूर यांची चारचाकी पळवून दरोडेखोरांनी पाचोऱ्याच्या दिशेने पलायन केले. रस्त्यात काही जणांनी या दरोडेखोरांना पाहिले. दुचाकी व चारचाकी भरधाव असल्यामुळे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले होते. परंतु, घटनास्थळ लांब असल्यामुळे त्यांना नेमकी घटना माहित नसल्याने कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेची चर्चा झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. दराेडेखाेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अाहे. 


तिघे वृद्ध असल्याने डाव साधला 
'मॉर्निंग वॉक'साठी सोमवारी सकाळी आलेले ठाकूर यांचे वय ५९ आहे. तर त्यांचे सहकारी तोतला यांचे ६९ आणि महाजन यांचे वय ७८ वर्षे आहे. तिघे वृद्ध असल्याने त्यांच्यावर पाळत ठेऊन दरोडेखोरांनी डाव साधून लुटमार केली. या घटनेनंतर मेहरूण तलाव परिसरात प्रचंड दहशत पसरली. दररोज शेकडो नागरिक मेहरुण तलाव परिसरात 'मॉर्निंग वॉक'साठी येतात. मात्र, ठाकूर यांच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


मेहरूण तलाव परिसर, पाचाेरा रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाेलिसांकडे 
१ दरोडेखोरांपैकी एक जण दुचाकीने पाचोरा रस्त्याकडे पळून गेला होता. त्या पाठोपाठ ठाकूर यांची चारचाकी घेऊन दुसरा दरोडेखोर गेला होता. १० मिनीटांनंतर दुचाकीस्वार दरोडेखोर पुन्हा शहरात अाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. दरम्यान, ठाकूर यांची ७ लाख रूपये किंमतीची चारचाकी व दोन हजार रुपयांची राेकड दरोडेखोरांनी लांबवली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...