आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव; समितीने वित्तमंत्र्यांना दिला अहवाल; आमदार सावकारेंची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्य सरकारने २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी समितीचे गठण केले होते. या समितीने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागाचे विभाजन करून भुसावळ जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. 


राज्यात नवीन २२ जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली होती. राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असून महसूल, वित्त, नियोजन, विभागीय आयुक्तांसह राजकीय नेत्यांचा समितीत समावेश आहे. या समितीने नुकताच वित्त विभागाकडे नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास यात यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील काही भाग समाविष्ट केला जाईल. 


जिल्हा निर्मितीची गरज का? 
यावल व रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला दुर्गम भाग तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्व भागाकडील कुऱ्हा काकोडा, वढोदा या भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी जळगावला जावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणाचे हे अंतर या गावांपासून किमान १२५ ते १४० किमी असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. तसेच जळगाव शहरात येताना लागणारा वेळही जास्त लागतो. यामुळे वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो. यामुळे नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी व भौगोलिकदृष्ट्या हे अंतर कमी करण्यासाठी भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, म्हणून आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केला. तसेच राज्य शासनानेही नवीन जिल्हा निर्मितीसाठी एक समिती गठीत केल्याने प्रयत्नांना फळ येण्याची चिन्हे दिसत आहेत. 


जिल्हा निर्मितीसाठी ३५० कोटींचा खर्च 
राज्य सरकारला नवीन जिल्हा निर्मितीसाठी तब्बल ३५० कोटी रुपयांचा खर्च करावा लागेल. मात्र, भुसावळातील सोयीसुविधा पाहता या खर्चात कपात करता येईल. शहरातील शासकीय कार्यालये, पोलिस विभाग, महसूल विभागाच्या सुसज्ज इमारती आहेत. यासह अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित आहे. आगामी काळात ट्रामा सेंटरमुळे आरोग्य सुविधा मिळेल. यामुळे भुसावळला जिल्हानिर्मितीसाठी पूरक स्थिती आहे. 


सुविधा उपलब्ध 
भुसावळ शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकांचे मोठे शहर आणि भौगोलिकदृष्ट्या विभागातील तालुक्यांना सहज संपर्क साधता येईल, अशी रचना आहे. जिल्हा निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने लवकरच दर्जा मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...