आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाकडून न्याय न मिळाल्यास जनहित याचिका दाखल करणार; ढाेबळे यांनी दिला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनेत पाेलिसांनी बघ्याची भूमिका निभावुन गावगुंडांना वाचवण्याचा प्रयत्न केला अाहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व्यस्त असल्याने व त्यांना ही घटना महत्वाची वाटली नसल्याने जळगावात येऊनही त्यांनी वाकडीला भेट दिली नाही. या घटनेमुळे या दाेन्ही मुलांचे कुटुंब दबावाखाली अाहे. शासनाकडून त्यांना याेग्य न्याय मिळाला नाही तर बहुजन रयत परिषदेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री लक्ष्मणराव ढाेबळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. 


माजी मंत्री ढाेबळे यांनी बहुजन परिषदेचे प्रदेश अध्यक्ष राजीव अावळे, उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, साहेबराव शुंगार, रवींद्र पाटील, रवींद्र वाकळे, रमेश कांबळे, माेहन चव्हाण, जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरवाडे, शहरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाेरसे, अनिल साठे, अनिल बाविस्कर अादींसह रविवारी वाकडी गावाला भेट देऊन पीडित मुलांसह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार संघात अायाेजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. या वेळी ढाेबळे यांनी पाेलिसांनी विहिर बदलवून केस कच्ची करण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेपही केला. गावात सर्व समाजात चांगले वातावरण अाहे. तर अाराेपी हा दाेनशे एकरचा धनी असल्याने पाेलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अाहे. या प्रकरणी तपासी अधिकाऱ्याच्या चाैकशीची मागणी त्यांनी केली. जामनेर तालुक्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. सरकारने या प्रकरणी पाेलिस प्रशासनाला जाब विचारला नाही, तर बहुजन रयत परिषदेचे तरुण दाेषींना कायदा शिकवतील, असेही ते म्हणाले. 


पालकमंत्र्यांना पदाला न्याय देता येत नाही
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता ढाेबळे यांनी पालकमंत्र्यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री असल्याने ते व्यस्त असतात. त्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला न्याय देता येत नाही. राज्य अाणि देशभर गाजलेल्या घटना त्यांना महत्वाची वाटली नाही, म्हणून त्यांनी जळगावात येऊनही वाकडी येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबांची भेट घेतली नाही, अशी टिका केली. 


पालकमंत्र्यांना भेटणार शिष्टमंडळ 
पालकमंत्र्यांना जरी वेळ नसला तरी बहुजन रयत परिषदेचे सदस्य वाकडीतील पीडित मुलांसाेबत पालकमंत्र्यांची भेट घेतील, असे ढाेबळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शासनाने त्यांना याेग्य न्याय न दिल्यास या दाेन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारून त्याचा काका म्हणून न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. 

 

संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडी 
पोलिसांनी अजित कासम तडवी (वय २०) व शकनूर सरदार तडवी (वय २३, दोघे रा. वाकडी) यांना शनिवारी अटक केली. रविवारी उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती दोघांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यात सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. 

 

घटनेच्या विरोधात ५ जुलैला निषेध मोर्चा 
वाकडी येथील मातंग समाजाच्या मुलांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात भीम आर्मी संघटनेतर्फे येत्या ५ जुलैला शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती भीम आर्मी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक कांबळे यांनी पत्रपरिषदेत दिली. कांबळे म्हणाले की, पीडित कुटुंबीयांच्या घरी जावून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यातील दोन्ही आरोपींना कडक शासन व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. जिल्हा दौऱ्यावर येऊनही पालकमंत्र्यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन विहिरीपर्यंत गेलेत. मात्र, पीडित कुटुंबीयांपर्यंत पोहचले नाहीत; याचाही कांबळे यांनी निषेध करत असल्याचे सांगितले. या घटनेसह मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलनाची जळगावपासून सुरुवात करुन हे आंदोलन राज्यभरात केले जाणार आहे. १७ राज्यांमध्ये भीम आर्मीचे संघटन असून त्या राज्यातही या मुद्यावर आंदोलन केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या सभा ज्या ठिकाणी होतात, तेथे दंगली होतात. त्यामुळे त्यांच्या सभांना परवानगी देऊ नये, असेही कांबळे म्हणाले. पीडित कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. पत्रपरिषदेस महासचिव सुनील थोरात, जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे, दीपक भालेराव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...