आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांवर आयकर विभागाचे छापे, रात्री उशिरापर्यंत झाडाझडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील चार ते पाच रुग्णालये, वैद्यकीय प्रतिष्ठानांची मंगळवारी आयकर विभागाने झाडाझडती घेतली. यामध्ये फिजिशीयन डाॅ. राहुल महाजन, स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. सुदर्शन नवाल, हृदयविकार तज्ज्ञ डाॅ. मिलिंद वायकाेळे यांच्या रुग्णालय व घरांची तपासणी करण्यात आली. सकाळी सुरू झालेली अायकर विभागाची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेती. ती दुसऱ्या दिवशीही सुरू राहणार अाहे. दरम्यान, या तपासणीविषयी माध्यमांना माहिती देण्यास अायकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला.

 

शहरातील चार वैद्यकीय प्रतिष्ठानांची एकाच वेळी अायकर विभागाची तपासणी प्रथमच हाेत असल्याने वैद्यकीय जगतात खळबळ उडाली हाेती. अायकर विभागाच्या २५ ते ३० जणांच्या पथकाकडून ही तपासणी करण्यात येत हाेती. जिल्हापेठ, रिंगराेड व प्रतापनगरातील रुग्णालयांमध्ये ही तपासणी हाेत हाेती. प्रत्येक ठिकाणी दाेन वरिष्ठ अधिकारी अाणि ७-८ जण कर्मचाऱ्यांचे पथक रुग्णांच्या फाइल्स, चेकबुक, बंँक स्टेटमेंट, वैद्यकीय बिले अादींची पडताळणी करीत हाेते. तपासणीवेळी रुग्णालयांमधील एकाही कर्मचाऱ्यास बाहेर जाऊ देण्यात आले नाही. जिल्हापेठ परिसरात डॉ. राहुल महाजन यांचे चिन्मय हॉस्पिटल आहे. मंगळवारी दुपारी इनाेव्हा कारने यात अाठ अधिकाऱ्यांचे पथक अाले. यात हिंदी भाषिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. या पथकाने रुग्णालयात येऊन तपासणीला सुरुवात केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारात खंड पडू नये, याचीही काळजी अायकर विभागातर्फे घेण्यात येत हाेती.

 

डाॅ.सुदर्शन नवाल यांच्या रिंगराेडवरील दवाखान्यातही अायकर विभागाने तपासणी केली. पथकातील पाच जणांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास डाॅ. नवाल यांच्या भास्कर मार्केट येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या चार मजली इमारतीला भेट देऊन तेथील बांधकामाचीही पाहणी केली. प्रतापनगरातील डाॅ. मिलिंद वायकाेळे यांच्या दवाखान्यातही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू हाेती. डाॅ. वायकाेळे यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्या वाॅर्डबाॅयने फाेनवर डाॅक्टर बाहेर गेल्याचे सांगितले.

 

नवीन बांधकाम अाणि विस्तारीकरणामुळे तपासणी
वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून असलेल्या आणि इमारतीचे विस्तारीकरण करणाऱ्या खासगी रुग्णालयांची झडती घेण्यात येते किंवा नव्याने माेठे रुग्णालय उभारणाऱ्या डाॅक्टरांची अायकर विभागातर्फे सर्वसाधारण तपासणी केली जाते. केंद्र सरकारने नाेटबंदी केल्यानंतर सर्वच क्षेत्रातील बेहिशाेबी पैसा बांधकामासाठी वळवल्याचा संशय अायकर विभागाला अाहे. त्यामुळे अपेक्षित अायकर न दाखविणाऱ्या वैद्यकीय जगताकडे अायकर विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले अाहे.


तपासणीच्या ठिकाणीच घेतले जेवण
डाॅ. महाजन व डाॅ. नवाल यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी अालेल्या अायकर पथकाने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दवाखान्यातच जेवण मागवून घेतले. तिथेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच जेवण केले.

 

नियमित तपासणी
मी मुंबईला रेल्वेने जात अाहे. तेथून जयपूरला जाणार अाहे. मलाही फाेनवरून याबाबत माहिती मिळाली. अायकर विभागाची ही नियमित तपासणी अाहे.
- डाॅ. सुदर्शन नवाल

 

तपासणीला सहकार्यच
अायकर विभागातर्फे केली जाणारी नियमित तपासणी अाहे. त्याला अाम्ही संपूर्ण सहकार्य करून सर्व कागदपत्र दाखवत अाहाेत.
- डाॅ. राहुल महाजन

बातम्या आणखी आहेत...