आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला ट्रॅक्टरने चिरडले, चाक अंगावरून गेल्यामुळे घटनास्थळीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत करूणा लवेंका, जखमी साक्षी नरखेडे. - Divya Marathi
मृत करूणा लवेंका, जखमी साक्षी नरखेडे.

जळगाव - महाविद्यालयात होळी खेळून परतणाऱ्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला शिरसोली रस्त्यावर ग्रॅपीज हॉटेलसमोर दुपारी भरधाव ट्रॅक्टरने उडवले. या दुर्दैवी घटनेत एक दुचाकीस्वार विद्यार्थिनीच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

करुणा रेनॉॅल्ड लवेंका, (वय १७ रा.समर्थ कॉलनी ) असे अपघातात मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर साक्षी राजेंद्र नारखेडे, ( वय १८ रा.एम.जे.महाविद्यालय परिसर ) ही संगणक पदविका अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी ट्रॅक्टरचालक सुरेश धोंडू झोपे,(रा.बामणोद) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ट्रॅक्टरचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

रंगपंचमी खेळून घरी परतत होत्या 
साक्षी व करूणा यांनी गुरुवारी दुपारी विद्यार्थिनींसोबत महाविद्यालयात रंगपंचमी खेळली. त्यासुद्धा रंगांनी माखलेल्या होत्या. त्यानंतर दोघी घरी परतण्यासाठी निघाल्या. साक्षीची (क्र. एम.एच.१९ बी.एच.३०७८ ) दुचाकी करूणा चालवत होती. दरम्यान, हॉॅटेल ग्रॅपीजसमोर शिरसोलीकडे जात असलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर दोन्ही विद्यार्थिनी दुचाकीवरून खाली पडल्या. करूणाच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. साक्षी ही गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला व डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दोघींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, साक्षीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कोल्हे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने प्रतापनगरातील कृपा क्रिटिकल केअर येथे हलवण्यात आले. तिच्या डोक्याला जबर मार बसलेला असून नाकाचे हाड मोडले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 


या हॉटेलसमोर अपघातग्रस्त मैत्रिणीला करूणाने केली होती मदत 
करूणा ही नेहमी गायत्री पाटील या विद्यार्थिनीसोबत दुचाकीवर काॅलेजात येत होती. परंतु, गुरुवारी गायत्रीला काॅलेजात येण्यास उशीर होणार असल्याने ती दुसरी मैत्रिण साक्षीसोबत दुचाकीवर काॅलेजला आली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राध्यापकांशी बोलताना करुणाची मैत्रिण गायत्री पाटील हिच्या वडिलांनी तिच्या धाडसी स्वभावाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी गायत्रीचा ग्रॅपीज हॉटेलसमोर अपघात झाला होता. त्या वेळी करुणाने मोठ्या हिमतीने गायत्रीला डी-मार्टजवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. याबाबत नंतर आम्हालाही कळवले होते. हा किस्सा सांगताना गायत्रीचे वडील अतुल पाटील भावनावश झाले होते. 

 

विद्यार्थी अाणि प्राध्यापक रुग्णालयात 
अपघातानंतर देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या वेळी करूणाच्या मैत्रिणींनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तिच्या आठवणींनाही उजाळा दिला. करूणाचा मृतदेह शवपेटीत रामानंदनगरातील सेंट फ्रान्सिस बिसेल्स चर्च येथे नेण्यात आला. तेथे धार्मिक विधी केल्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. मृत करूणा हिच्या पश्चात वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. तिचा विल्सन नावाचा भाऊ आमदार सुरेश भोळे यांच्याकडे चालक आहे.  

बातम्या आणखी आहेत...