आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड रिकामा करण्यासाठी मालकाने पेटवली झाेपडी, जीव मुठीत घेऊन पळाले बालके अाणि महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खुल्या भूखंडावर झोपडी टाकून राहणाऱ्या कुटुंबाला हटवण्यासाठी जागा मालकाने झाेपडीची मोडतोड करून ती लायटरच्या साह्याने पेटवून दिली. झोपडीत झाेक्यात १३ दिवसांची चिमुरडी तर एका कोपऱ्यात खाटेवर ७० वर्षीय वृद्ध महिला होती. माणूसकीला काळिमा फासणारी ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता मेहरूण तलाव परिसरातील दौलतनगरातील खुल्या भूखंडावर घडली.

 

मेहरूण तलावास लागून असलेल्या भूखंडावर अनेक उतारकरू सुमारे २० ते २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यात दिनेश कन्नो गुजराथी यांचेही कुटुंब राहते. गेल्या काही दिवसांपासून गुजराथी यांच्याकडे मालकांनी जागा रिकामी करून देण्याचा तगादा लावला होता; पण पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे गुजराथी यांच्यासह ७ ते ८ कुटुंबांनी मालकाकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. रविवारी सकाळी १० वाजता जागा मालक विजय सिंधी व पिंटू सिंधी हे दोघे दुचाकीने झाेपड्यांजवळ पोहोचले. 'आताच जागा रिकामी करा' असा तगादा त्यांनी लावला. या वेळी परिसरात राहणाऱ्या किशोर वाघेला यांनी विजय सिंधी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग अाल्यामुळे विजय यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिनेश गुजराथी व त्यांच्या पत्नी पूनम यांना देखील मारहाण केली. यातच जागा मालकांनी गुजराती यांची झोपडी तोडण्यास सुरुवात केली. या वेळी गुजराथी दांपत्याची १३ दिवसांपूर्वीच जन्मलेली बालिका झोपडीच्या लाकडी दांड्यास बांधलेल्या झोक्यात होती. तर एका कोपऱ्यात ७० वर्षीय वृद्ध महिला होती. असे असताना देखील जागा मालकासह एकाने झोपडीचे छत, बल्ल्या हलवून तोडल्या. नंतर काही क्षणातच लायटरच्या साह्याने थेट झोपडी पेटवली.


क्षणार्धात झोपडीने पेट घेतल्याने सर्वत्र पळापळ झाली. लहान मुले, महिलांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला. तर काही नागरिकांनी झोपडी विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच वृद्ध व चिमुरडीला झाेपडीतून बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. झोपडीतील सर्व संसारोपयोगी साहित्याची राख-रांगोळी झाली. यात घरगुती सामान, टी.व्ही., होम थिएटर, कपडे असे ३० हजार रुपयांचे साहित्य, तसेच बकऱ्या विकून डब्यात ठेवलेले ९० हजार रुपये रोख असे एकूण १ लाख २० हजार रुपये देखील यात जळून खाक झाल्याचे गुजराथी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच बकरी, बोकड विक्री करून पैसे आणले होते. या पैशांनी नवीन झोपडी तयार करण्याची तयारी होती, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, झोपडी पेटवून दिल्यानंतर जागा मालकाने गुजराथी कुटुंबीयांना उद्देशून शिवीगाळ करीत पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यामुळे मालकाला पोलिसांचा धाक नसल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. सुरुवातीला पोलिस कर्मचारी अशरफ शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, या प्रकारानंतर गुजराथी यांनी कुटुंबीयांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी चौकशी करीत आहेत.

 

प्रचंड भीती अन् आक्रोश : घटनेनंतर गुजराथी कुटुंबीयांसह सर्व झोपड्यांमधली नागरिक प्रचंड भीतीत होते. लहान मुले अक्षरश: झाडाखाली रडत बसलेले होते. तर आगीत संसाराची राख-रांगोळी झाल्यामुळे गुजराथी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. 'कुछ दिनो की मुदत दे देते तो हम निकल जाते, आग लगा के क्या मिला?, अब हमारे पास कुछ नही बचा, छोटे बच्चे काे लेकर कहा जाऐंगे' असे म्हणत गुजराथी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. गुजराथी दांपत्यास चार मुले आहेत.

 

घटनेचे व्हिडिओ चित्रण उपलब्ध : जागा मालक झोपडी जवळ आल्यापासून सुरू झालेल्या गोंधळाचे व्हिडिओ चित्रण एकाने मोबाइलमध्ये करून ठेवले होते. यात जागा मालकाने केलेली शिवीगाळ, मुजोरी दिसून येतेे. हे व्हिडिओ चित्रण नागरिकांनी 'दिव्य मराठी'स उपलब्ध करून दिले आहे.

 

कोळन्हावीजवळ जागेचा शोध : सुरेंद्रनगर (गुजरात) येथून आलेले हे ७ ते ८ कुटुंब मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. जळगावात येऊन त्याना २० पेक्षा जास्त वर्षे झालेली आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाचे आधार कार्ड, रेशनकार्ड देखील जळगावच्या पत्त्यावर तयार केलेले आहे. असे असताना मालकाने जागा रिकामी करून देण्याचे सांगितले होते. झोपड्या उठवून कोळन्हावीजवळील मोकळ्या जागेवर घेऊन जाण्याचा प्रस्ताव जागा मालकाने दिला होता. काही जणांनी जागेची पाहणी देखील केली; पण काम-धंद्यासाठी ती जागा योग्य नसल्यामुळे तसेच शहरापासूनचे अंतरही जास्त असल्यामुळे तेथे जाण्यास त्यांनी नकार देऊन शहरास लागून असलेल्या पर्यायी जागेचा ते शोध घेत हाेते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जीव मुठीत घेऊन पळतानाचे बालक व महिलांचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...