आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू व्यावसायिकाचा शहर पोलिस ठाण्यात धिंगाणा, तक्रार देण्यावरून गाेंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मारहाण झालेल्या जखमी मित्रास पोलिस ठाण्यात अाणून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत एका वाळू व्यावसायिकाने शहर पाेलिस ठाण्यात धिंगाणा घातला. तसेच पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री २ वाजता घडला. या प्रकरणी संबंधितावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना पाेलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अाहे.


त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेले मोबाइल आरटीपीसी गणेश पाटील, संजय झोपे, नाईट चेकिंग अधिकारी सहाय्यक फौजदार सादिक शेख यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पाेलिस पुन्हा पोलिस ठाण्यात परतले. त्या वेळी वाळू व्यावसायिक राजेश मिश्रा (रा. शाहूनगर) हा शहर पोलिस ठाण्याजवळ उभा होता. मिश्रा याचा मित्र इम्रान यास मारहाण झाल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्याला मेडिकल मेमो देऊन औषधोपचारासाठी सरकारी वाहनातून सिव्हिलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला ठाणे अंमलदार रईस शेख यांनी दिला; परंतु मिश्रा याने मेडिकल मेमो घेण्यास नकार दिला. मिश्रा याने गोंधळ घातल्यानंतर गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, साेमवारी मध्यरात्री राजेश मिश्रा व इम्रान हे दाेघे स्वत: जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. मंगळवारी दुपारी दाेघांना रुग्णालयातून साेडण्यात अाले.

 


'पोलिसवाले मातले आहेत', असे म्हणत दिली धमकी
मिश्रा यास पोलिस समजावून सांगत असताना, त्याने कर्मचारी गणेश पाटील याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. 'इम्रानला कोणीही हात लावू नये, मी त्यास दवाखान्यात घेऊन जाऊ देणार नाही. इम्रानला पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या चेंबरच्या समोर टाकून देईल' असे सांगितले. तसेच 'तुझे नाव गणेश आहे ना, तू मला गणपतीच्या वेळेस सुद्धा नडला होता, तुम्ही पोलिसवाले जास्त मातले आहेत, तुमचा बंदोबस्त मी करतो व तू नोकरी कशी करतो हे मी पाहून घेतो. राजेश मिश्रा कोण आहे? हे तुम्हाला माहिती नाही का' अशा भाषेत बोलून मिश्रा याने गणेश पाटील यांना धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार शहर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.

 

मिश्रा यास अटक नाही
गुन्हा दाखल होण्याच्या वेळी मिश्रा व जखमी इम्रान पोलिस ठाण्यात बाहेर पडला हाेता. इम्रान याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मिश्रा यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

 

जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयात गोंधळाचा प्रयत्न
मिश्रा याने जखमी अवस्थेत असलेल्या इम्रानला मध्यरात्रीच पोलिस अधीक्षक कार्यालयात नेले होते. तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यास पुन्हा शहर पोलिस ठाण्यात पाठवून ही माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना कळवली. त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेले सांगळे यांनी मध्यरात्रीच शहर पोलिस ठाणे गाठून मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सांगळे येईपर्यंत वाळू व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात येऊन अशा प्रकारे गोंधळ घातल्यानंतर देखील पोलिस कर्मचाऱ्यांनी काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे सांगळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.
 

बातम्या आणखी आहेत...