आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जळगाव जिल्ह्यातील विहिरींची पाणीपातळी खालावलेली असून तब्बल ८१४ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र पाणीटंचाई होते. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरमध्येही वाढ झालेली अाहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ९० गावांमध्ये ५७ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक पाणीटंचाई अमळनेर तालुक्यात आहे. या तालुक्यातील ४४ गावांमध्ये २१ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यात २२ गावांना १९ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पारोळा तालुक्यातील १७ गावांना ८ टँकर्स, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात प्रत्येकी १, पाचोरा तालुक्यात १ गावात ३ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये एप्रिल महिन्यात वाढ झालेली आहे. त्यातच बोअरवेलला शासनाने ठरवून दिलेल्या २०० फुटांच्या मर्यादेत पाणी लागत नाही. त्यामुळे ही उपाययोजना कुचकामी ठरत आहे. टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने प्रस्ताव मंजुरीला विलंब लागत आहे. त्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर मंजुरी करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
१२७ गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत
पाणीटंचाई असलेल्या १२७ गावांमध्ये १२४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक ३० विहिरी अमळनेर तालुक्यात अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जामनेर तालुक्यातील २८ गावांसाठी २७ विहिरी, मुक्ताईनगर १४, बोदवड १०, पारोळा ११, भुसावळ ८ अशा प्रमाणे विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २० गावांमध्ये २० तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहे. २१ गावांमध्ये ५३ कूपनलिका घेण्याचे नियोजित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.