आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: वृद्ध शेतकऱ्याची विहीर वीजपंपासह गेली चोरीस; तलाठ्याचा कारनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील शेतातील विहिरीसह इलेक्ट्रिक पंप व इतर साहित्य चोरीला गेले असल्याची व्यथा वयोवृद्ध शेतकरी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना भेटून मांडली. तलाठ्याच्या कारनाम्यामुळे ही विहिर चोरीला गेली असल्याचा आराेप वृद्ध शेतकऱ्याने केला आहे. 


नशिराबाद येथील दयाराम सोना रोटे (वय ८० ) यांनी १९७१मध्ये नशिराबाद येथील गट क्रमांक १२३५मधील शेतात विहिर खोदली होती. त्या विहिरीत पाण्याचा इलेक्ट्रिक पंप बसवून पाइपलाइन टाकली होती. १९७१पासून त्या विहिरीच्या पाण्यावर ते केळी, ऊस या बागायती पिकांना पाणी देत होते. दरम्यानच्या काळात २००८मध्ये शेजारील अरूण विष्णू पाटील व संतोष विष्णू पाटील यांनी शेताची मोजणी केली. त्यावेळी विहिर रोटे यांच्याच शेतात होती. परंतु, सन २०११मध्ये अरूण व संतोष पाटील यांनी तलाठ्याशी संगनमत करून शेताची पुन्हा मोजणी केली. त्यावेळी तलाठ्याने त्यांच्या शेतात ही विहिर दाखवली. या पाटील बंधूंनी विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप जोडणी व इतर साहित्य चाेरले आहे. तसेच शेतात जाण्यासाठीच्या वहिवाट रस्त्यातून देखील जाण्यास मज्जाव केला जाताे. तसेच त्यांच्याकडून धमकी देत असल्याने शेतात पेरणी केलेली नाही. त्यामुळे शेती पडीक असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी व्यथा वृद्ध शेतकऱ्याने मांडली अाहे. माझी विहिर मला परत मिळावी, तसेच चोरलेला इलेक्ट्रिक पंप व इतर जोडणी साहित्य परत देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रोटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...