आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील कार्यालयात आधार कार्ड नोंदणीच्या बैठकीत गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक झाली.

तहसीलदार वैशाली हिंगे, आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी अनिल जगताप हे उपस्थित होते. मात्र, आधार कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या कमी असल्याने दिवसभर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या बैठकीत धडक प्रवेश करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी समजूत घातल्याने संतप्त जमाव शांत झाला. आधार कार्ड नोंदणीबाबत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सावकारे यांनी आधार कार्ड नोंदणी कार्यक्रम राबविणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. शहरात किती ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत? नवीन मशीन कधी येणार? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी या बैठकीत केली. किन्ही येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तेथे ऑपरेटरच नाही. एखादा ऑपरेटर सुटीवर जात असेल तर त्याच्या जागेवर दुसर्‍या कर्मचार्‍याची कंपनीने नियुक्ती करावी. पालिकेनेही नियोजन करून विविध भागात आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. तालुक्यात कुठे आणि किती आधार नोंदणीचे मशीन सुरू आहेत? अशी विचारणा आमदार सावकारे यांनी तहसीलदारांना केली. मात्र, त्यांना पुरेशी माहिती नसल्याने संबंधितांना खडेबोल सुनावले. शहरासह तालुक्यात कोठेही आधार नोंदणीचे केंद्र सुरू करायचे असल्यास माझी परवानगी घ्यावी, असेही आमदारांनी या बैठकीत ठणकावून सांगितले. शहरातील आधार कार्ड नोंदणी केंद्रावर गर्दी होत असल्याने अनेकदा आम्हाला धक्काबुक्कीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळाले पाहिजे; तरच आम्ही काम करू, असे एका ऑपरेटरने या बैठकीत सांगितले. त्यानंतर नगरसेवकांनी काळजी करू नका. आम्ही आहोत ना, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी आधार कार्ड नोंदणी केंद्रावरील एका महिला ऑपरेटरलाही या बैठकीत खडसावले.

फक्त 10 मशीन
भुसावळ शहरासह तालुक्यात 10 ठिकाणी आधार कार्ड नोंदणीचे मशीन उपलब्ध आहेत. त्यात भुसावळ शहरात 2, फेकरी 2, वरणगाव 2, साकेगाव 4 असे मशीन उपलब्ध आहेत. लवकरच चार मशीन नव्याने येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र 1 मशीन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.