आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनागोंदी: भुसावळात टपालामुळे 'आधार' झाले निराधार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- टपाल विभागामुळे आधार कार्ड आता निराधार झाले आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी स्पीड पोस्टाने मिळणारे आधार आता साध्या पोस्टाने मिळताहेत. शहरातील टपाल यंत्रणेत आधीच 10 पोस्टमनची कमतरता आहे. त्यामुळे काही पोस्टमन आलेले आधार कार्ड त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हातात टेकवतात. ‘युनिक आयडेंटीफिकेशन अँथॉरेटी ऑफ इंडिया’च्या निकषांना शहरात वाटाण्याच्या अक्षता लागताना प्रशासकीय यंत्रणा कमालीची सुस्तावली आहे.

सप्टेंबर 2010 मध्ये शासनाने आधार कार्ड योजना अंमलात आणली. मात्र किचकट प्रक्रिया तसेच मशीनची कमतरता आहे. यामुळे अजून किमान पाच वर्षे नोंदणी पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. राज्यभरात आधारच्या नोंदणीला नागरिकांचा थंड प्रतिसाद असला तरी भुसावळात मात्र पहाटे चार वाजेपासूनच रांगा लागतात. मात्र आधारची नोंदणी केल्यावर ते मिळेलच याची शाश्वती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. पंधरवड्यापूर्वी शहरात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून वितरित होणारे आधार कार्ड अँथोरेटी ऑफ इंडियाकडून स्पीड पोस्टाद्वारे येत होते. स्पीड पोस्टमुळे या कार्डची नोंदणी करण्याचे बंधन टपाल कार्यालयावर होते. कोणाच्या नावे टपाल आले, ते कधी वितरित झाले? याची माहिती ठेवावी लागत असे. सध्या मात्र आधार कार्ड साध्या पोस्टाने येत आहे. त्यामुळे त्याची कोणतीही नोंद टपाल कार्यालयात होत नाही.

भुसावळ शहरातील टपाल कार्यालयाच्या 23 बिटसाठी केवळ 13 पोस्टमन आहेत. 10 जागा रिक्त आहेत. टपाल कार्यालयाने ग्रामीण डाक सेवकांना पोस्टमनचे वेतन देऊन त्यांच्यावर पोस्टमनची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, काही पोस्टमन कामाचा त्रास वाचविण्यासाठी एखाद्या वॉर्डातील दररोज येणारे आधारकार्ड त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हातात सोपवून मोकळे होतात.

परिणामी नगरसेवकांना जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी आधारची मदत झाली आहे. यामुळे मात्र नोंदणी केल्यावरही आधारकार्ड मिळेलच याची शाश्वती नाही. पोस्टातील कर्मचार्‍यांनी स्वत:चा त्रास कमी करण्यासाठी चालविलेले हे उद्योग आधार कार्ड काढलेल्यांच्या मुळावर उठणारे आहेत.

शहरात नियंत्रणच नाही
आधार कार्डच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने कोणलाही नियुक्त केलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत शहरातील किती लोकांनी आधारची नोंदणी केली? प्रत्यक्ष किती लोकांना कार्ड मिळाले? याचे उत्तर नाही. पालिकेसह महसूल आणि संबंधित कंत्राट घेतलेल्या कंपनीला याबाबत माहिती नाही. आधारची नोंदणी करून वर्ष झाले. तरीही आधार मिळाले नाही, असे किमान तीन ते चार हजार नागरिक आहेत.

विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आधारची डोकेदुखी ठरत आहे. शाळा प्रशासन आधारकार्डची मागणी करीत असून दुसरीकडे मात्र नोंदणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. शाळांमध्येच मशीन मिळाल्यास डोकेदुखी थांबेल

नगरसेवकांकडे कार्ड कसे ?
आधार कार्ड पोस्टमनकडून घरपोच मिळणे आवश्यक आहे. मात्र, आमच्या कुटुंबीयांचे आधार प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाले. टपाल कार्यालयातून नगरसेवकांकडे आधार गेलेच कसे ? कामाचा ताण असल्यास टपाल कार्यालयाने मनुष्यबळ वाढवावे. आपली जबाबदारी इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. अधिकृत केंद्रांवरच आधारची नोंदणी झाली पाहिजे.
-श्याम वलकार, रहिवासी, जळगावरोड, भुसावळ

चौकशीनंतर फुटेल बिंग
शहरातील प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांना दोन वर्षांपूर्वी नोंदणी करून अद्यापही आधार कार्ड मिळालेले नाही. ऑनलाइन स्थिती तपासली असता डाटा दिसत नाही. नोंदणी करणार्‍या कंपनीने हा डाटा दाखलच केला नाही किंवा कार्ड शहरात येऊन ते टपाल खात्याच्या कारभारामुळे घरापर्यंत पोहोचलेले नाही.
-शिशिर जावळे, रहिवासी, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ

इंटरनेटवरही नोंदणीची सुविधा
आधार कार्डची योजना लोकांपर्यंत पोहोचावी. यासाठी शासनाने अजून काही कंपन्यांना कंत्राट देण्याचा विचार सुरू केला. मात्र तासन्तास रांगेत उभे राहून आधार कार्ड कोण काढणार ? असा कं टाळा करणार्‍यांसाठी इंटरनेटवरून आधार कार्डची नोंदणी सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी www.uidai.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरावा लागणार आहे.