आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त गवसला: ‘आधार’चा श्रीगणेशा; शाळेत नोंदणी सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका हद्दीत वर्षभरापासून रखडलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. बुधवारपासून शहरातील लुंकड कन्याशाळेत केवळ विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. आधारसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीजकडून तातडीने यंत्र मागविली जात असून पुढील आठवड्यात शहरातील चारही प्रभागात शालेय व नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यातील आधार नोंदणीला सुरुवात झालेली असताना महापालिका हद्दीत मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे काम सुरू झाले नसल्याकडे ‘दिव्य मराठी’ ने लक्ष वेधले होते. यंत्रणेतील समन्वयाचा अभाव उघड झाल्याने जिल्हाधिकार्‍यांकडून याची दखल घेत ‘खानसरी एजन्सी’ला याकामी नियुक्त केले आहे. शहरातील चार प्रभागांमध्ये काम सुरू करण्यासाठी 25 मशीन उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सीकडे सद्य:स्थितीत दोन मशीन उपलब्ध असल्याने बुधवारी लुंकड कन्याशाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे. प्रभाग अधिकार्‍यांकडून प्रत्येक भागातील मध्यवर्ती भागातील शाळा खोल्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू झाला आहे. सोमवारपासून सर्वच प्रभागात नोंदणीला सुरुवात होणार आहे, मात्र स्थळ निश्चित नाही.

नोंदणीस आवश्यक कागदपत्रे
आधार नोंदणीसाठी नाव व पत्त्यासाठी 29 पर्याय देण्यात आले आहेत यात पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, रोजगार गॅरंटी कार्ड, शस्त्र लायसन्स, क्रेडिटकार्ड स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस किंवा इजीएचएस कार्ड, पोस्ट विभागातील निवास प्रमाणपत्र, खासदार किंवा ‘अ’ र्शेणीतील राजपत्रित अधिकार्‍यातर्फे देण्यात आलेले निवास प्रमाणपत्र, शासकीय फोटो आयडी, पेन्शन कार्ड, टेलिफोन बिल, विजेचे बिल, संपत्ती कराची पावती तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे. विम्याची पॉलिसी, बँकेने किंवा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेने लेटरहेडवर दिलेल्या फोटोसह स्वाक्षरीकृत पत्र, आयकर मूल्यांकन आदेश, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, रजिस्टर्ड सेल, लीझ, रेंट अँग्रीमेंट, राज्य सरकारद्वारे देण्यात आलेला जात आणि अधिवास प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुक.

अशी असेल नोंदणीची वेळ
सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक प्रभागात ठरवून दिलेल्या केंद्रात आधारची नोंदणी करण्यात येईल. दिवसभरात एका मशीनवर किमान 50 ते 80 व्यक्तींची नोंदणी केली जाते. 25 मशीनवर एका दिवसाला सरासरी दोन हजार व्यक्तींची नोंदणी करणे शक्य आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढल्यास वेळ वाढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

पुढच्या आठवड्यात नोंदणी होणार
आधार नोंदणीसाठी नियुक्त एजन्सीच्या प्रतिनिधीशी माझे बोलणे झाले आहे. नागरिकांना सोयीच्या ठरतील अशा शाळा शोधण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील आठवड्यात कामाला सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. एस.एस.भोळे, प्रभाग अधिकारी

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश प्राप्त नाही
जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशाची प्रत अद्यापही आपणास प्राप्त झालेली नाही. शहरातील सर्वात मोठा प्रभाग असल्याने मशीन वाढवून देण्याची मागणी आपण करणार आहोत.
-उदय पाटील, प्रभाग अधिकारी एक

शाळा खोल्यांची झाली निश्चिती
सिद्धिविनायक, शारदा विद्यालय, लायन्स क्लब हॉल व मेहरूणमधील अन्य चार ठिकाणी मशीन लावण्यात येणार आहे. मशीन मिळताच ठिकाणे जाहीर करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात येईल. सुनील भोळे, प्रभाग अधिकारी तीन

आजच सायंकाळी आदेश प्राप्त झाले
-जिल्हाधिकार्‍यांचे आदेश बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. प्रभाग-4मध्ये आठ मशीन मिळणार असून यासाठी ठिकाणे निश्चिती करण्याचे काम बाकी आहे.
-अविनाश गांगुर्डे, प्रभाग अधिकारी

सोमवारपासून वाढेल मशीनची संख्या
आधार नोंदणीसाठी जिल्हाभर उपलब्ध असलेली यंत्रणा सध्याच्या स्थितीत कमी आहे. मशीनची संख्या, मनुष्यबळ वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव शहरात उशीर झाला आहे. सध्या मशीनची संख्या कमी आहे. सोमवारपासून आणखी 10 मशीन येणार आहेत. त्यामुळे कामाला काहीशी गती मिळेल. पुढील आठवड्यात मशीनची संख्या वाढविण्यात येईल. जिल्ह्याभरात मशीनची संख्या अपुरी असल्याने तिकडील मशीन शहरात आणता येणार नाही. संबंधित कंपनीला मशीन वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या टप्प्यात शहरातील सर्व लोकसंख्या कव्हर करण्यात येईल. पहिला टप्पा थांबल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरकारी कामांमध्ये आधारची मागणी होत असल्याने नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र या वेळी सर्वांची नोंदणी होईल. बोगस नोंदणी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या गोष्टीला आळा घालण्यासाठी नियमावलीत दिलेले कागदपत्रे सादर करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.
-ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी.