आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: ‘आधार’ची सक्ती; ग्राहक पुन्हा गॅसवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- गेल्या वर्षी केवायसीमुळे हैराण झालेल्या गॅस ग्राहकांवर आता आधार कार्ड सक्तीमुळे भटकंतीची वेळ आली आहे. 1 एप्रिलपासून बँकेतील खात्यास आधार कार्ड लिंक होणार असून यासाठी आधारची झेरॉक्स प्रत देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश ग्राहकांकडे आधारच नसल्याने त्यांना सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही.

शहरात गॅस सिलिंडरचा वापर करणारे 90 हजार ग्राहक आहेत. यापैकी फक्त 900 ग्राहकांनी आधार कार्ड काढून त्याची झेरॉक्सप्रत गॅस एजन्सीज्कडे जमा केलेली आहे. मात्र, तब्बल 89 हजार ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दुसरीकडे येत्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून गॅस सिलिंडरचे अनुदान संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँकेतील खातेक्रमांकासह आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही सर्व प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मात्र, एकीकडे सक्ती तर दुसरीकडे आधार कार्ड काढण्यासाठी शहरात पुरेसे मशीन उपलब्ध नाहीत. जेमतेम दोन मशीन उपलब्ध असून कार्ड तयार करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे गॅस ग्राहकांची अवस्था, ‘आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना’ अशी झालेली आहे. उपलब्ध दोन मशीनच्या आधारावर किमान वर्षभर तरी शहरातील आधार कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. मध्यंतरी तहसीलदार वैशाली हिंगे यांनी चार तर आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सहा आधार कार्ड मशीनची मागणी केली होती. मात्र, केवळ दोनच मशीन उपलब्ध झाले. पालिका दवाखान्यात उपलब्ध असलेल्या या मशीनवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. महसूल यंत्रणा ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. 1 एप्रिलपासून मिळणार्‍या सिलिंडरवरील थेट अनुदानापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुसावळात किती आधार नोंदणी मशीनची आवश्यकता आहे त्यासाठी सोमवारी तहसीलदार वैशाली हिंगे बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

31 मार्चपर्यंतच डेडलाइन
गॅस एजन्सीमध्ये आधार कार्डची झेरॉक्स प्रत जमा करण्याची मुदत 31 मार्च 2013 पर्यंत आहे. या मुदतीत स्वत:च्या स्वाक्षरीने अँटेस्टेड कागदपत्रे जमा न झाल्यास 1 एप्रिलपासून मिळणारी सबसिडी बँक खात्यात जमा होणार नाही. तर जे ग्राहक बँक खाते आणि आधार कार्डची झेरॉक्स देतील, त्यांना सरासरी एक हजार ते 1100 रुपये सिलिंडरसाठी द्यावे लागतील. नंतर सबसिडीची रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा होईल.

शासनाकडून माहिती मागवली
महसूल यंत्रणेने प्रत्येक गॅस एजन्सीकडून एक आणि दोन सिलिंडर वापरणारे, आधार कार्डची झेरॉक्स प्रत जमा करणार्‍या ग्राहकांची माहिती मागवली आहे. याबाबत तहसीलदारांनी गॅस एजन्सीधारकांना पत्र दिले आहे.

कंपनीच्या नियमानुसार कामे सुरू
एक एप्रिलपासून मिळणार्‍या सबसिडीसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. नियमानुसार काम करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, शासनाने मुदत वाढवून दिली तर ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळेल. दीपक महाजन, संचालक, वर्षा गॅस एजन्सी, भुसावळ