आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक तारखेलाच पैसे जमा; निराधारांना मिळाला ‘आधार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- निराधार म्हणून शासकीय योजनेतून अनुदान मिळत असले तरी, त्यासाठी शासकीय कार्यालयांच्या चकरा, दलालांची फी आणि प्रत्येक वेळी वेळेवर पैसे मिळतीलच याची शाश्वती नसल्याने निराश झालेल्या निराधारांना सोमवारी खर्‍या अर्थाने ‘आधार’ मिळाला.

थेट अनुदान योजनेत समावेश झाल्यापासून अवघ्या दीड महिन्यात जळगाव जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते उघडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या 1,275 लाभार्थ्यांच्या थेट बॅँक खात्यात 1 जुलै रोजी पैसे भरून या योजनेची सुरुवात करण्यात आली.

1 ऑगस्ट रोजी पोस्टात खाते असलेल्या 15 हजार लाभार्थ्यांना थेट बॅँकेत पैसे मिळतील. शासनाचे अनुदान केव्हा मिळेल याची खात्री नसल्याने निराधारांना या अनुदानाचा फारसा फायदा होत नव्हता; मात्र आता थेट अनुदान योजना व नवीन तंत्रज्ञानामुळे महिन्याच्या पहिल्याच तारखेला बॅँकेतील खात्यातून पैसे काढण्याचे सुख लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बॅँकेचा खाते क्रमांक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेमुळे शासकीय कार्यालयांच्या चकरा, समित्यांची मध्यस्थी, दलालांची चलती, अनुदानासाठी बॅँकेतील रांगा व यातून निर्माण होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.


1275 जणांना मिळाला लाभ
डीबीटी (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) योजनेमुळे पहिल्याच तारखेला हातात पैसे पडल्याचे सुख त्यांना मिळाले. राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते असलेल्या 1,275 जणांना या योजनेचा लाभ मिळाला.