आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आप’ विधानसभेच्या सहा जागा लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभा निवडणुकीत डिपॉझिटही वाचवू न शकलेल्या आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, जळगाव जिल्ह्यातील सहा जागा संपूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी सकाळी 11 वाजता गाजरे हॉस्पिटल येथे डॉ.सुनील गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रा.शेखर सोनाळकर, सुभाष तंवर, डॉ.संग्राम पाटील यांच्यासह सुमारे 30 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील माघारनाट्यासंदर्भात असंतोष व्यक्त करण्यात आला. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलेल्या कॉँग्रेस, शिवसेना व खान्देश विकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सगळे एकच आहेत. तसेच खाविआचा उमेदवार त्यांचे नेते रमेश जैन यांचे ऐकत नाही; पण भाजपच्या नेत्यांचे ऐकत असल्याचे चित्र दिसून आल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

आता आमदार सुरेश जैन व खासदार ईश्वरलाल जैन यांची सद्दी संपली असून, जिल्ह्यात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे राज्य सुरू झाल्याची टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जागेवर भाजपच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत निवडणूक ही तत्त्वांची असते, व्यक्तिमत्त्वाची नसल्याचे विचार देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
आता लक्ष्य विधानसभा
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन केल्यानंतर आता जिल्हा कार्यकारिणीने विधानसभेसाठी नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत ही निवडणूक लढवण्याची इच्छुकांची तयारी आहे. मात्र, केवळ सहा जागांवरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी इच्छुकांची नावे घेण्यात आली असून, या सहा जागांकरिता संपूर्ण ताकद लावण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कार्यकारिणीची निवड
बैठकीत गाव व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील महिन्यात यासाठी राज्यपातळीवर पाठपुरावा करण्याचे ठरले. यासह वाघनगरातील पाणीप्रश्नबाबत आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे शिवराम पवार यांच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.