आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ची सूत्रे ‘खास’ लोकांच्या हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात जोमाने पदार्पण करणारी आणि खोऱ्याने नेते कार्यकर्ते खेचणारी आम आदमी पार्टी आता सर्वाधिक वाद असलेली पार्टी ठरली आहे. पक्षसंघटन उभे राहण्यापूर्वीच त्यात प्रत्येक तालुक्यात दुफळी निर्माण झाली आहे. पक्षसंघटनेसाठी मुंबईहून पाठवण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याने स्थानिक पातळीवर पक्षाची पुरती वाट लावली असून, ‘आप’ हा ‘खास’ लोकांचा पक्ष झाल्याची स्थिती आहे. यासंदर्भात जळगावातील ‘आप’चे कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी पक्षाचे राज्य समन्वयक सुभाष वारे यांना पत्र पाठवले आहे.
आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून रवी श्रीवास्तव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदे विकून ‘आप’ची सूत्रे ‘खास’ लोकांच्या हाती दिली आहेत. श्रीवास्तव यांनी उत्तर महाराष्ट्रातील काम करणारी कमिटी विस्कटून टाकली आहे.
तसेच पक्षाचे काम ठप्प केल्याची तक्रार मी यापूर्वीच तुमच्याकडे केली असून, त्यावर कोणतीही कारवाई किंवा चाैकशी झालेली नसल्याचे शिवराम पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. ‘आप’च्या स्थापनेपासून पूर्णवेळ काम करणारी माणसे हटवून पैसा देऊन पदे मिळवणाऱ्या, पक्षाचा आश्रय घेणाऱ्या, संधी पाहून पक्षाचे लेबल लावणाऱ्या काम झाल्यावर पक्ष सोडून जाणाऱ्या माणसांच्या हाती कमिटी सोपवली. पक्षात उच्चभ्रू लोकांचे वर्चस्व वाढवल्यामुळे सामान्य माणूस दुरावला असून, विशिष्ट लोकांनी पक्षाचे ‘पेटंट’ घेतल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
सोशल मीडियावर ‘आप’ गाजतेय
जळगाव जिल्ह्यातील ‘आप’मध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचे किस्से सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. पक्षातील घटना-घडामोडी, श्रीवास्तव यांच्याकडून होत असलेले राजकारण आदी बाबींवर चर्चा होत आहे.

पक्षापासून कार्यकर्ते दुरावले
जनसंपर्क करणारी जनहितासाठी आंदोलन करणारी माणसे पक्षापासून दुरावली आहेत. श्रीवास्तव यांना येथील समस्या माहीत नाहीत. पदे देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून ते कार्यकर्त्यांना प्रलोभन दाखवतात आपल्या सोयी-सुविधा पुरवून घेतात. ते काहीही धोरणात्मक काम करत नाहीत. कार्यकर्ते आपल्या समस्या बैठकीत मांडतात. पण, योग्य उत्तर मिळत नसल्यामुळे निराश होतात अन‌् नाइलाजाने सोशल मीडियावर लिहितात. मात्र, ही दखल घेत नसल्याचे पाटील यांनी लिहिले आहे.
बातम्या आणखी आहेत...