आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम आदमी पार्टी’ गाळेधारकांसोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भिकेला लागलेल्या महापालिकेने व्यापार्‍यांना दुकानाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका व्यापार्‍यांवर अन्याय करीत आहे. मुळातच गाळे असलेली जमीन मनपाची नसून, शासनाची आहे. त्यामुळे व्यापार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात आम आदमी पार्टी व्यापार्‍यांच्या पाठीशी राहील. तसेच पालिकेच्या भूमिकेविरुद्ध व्यापार्‍यांनी आंदोलन उभारल्यास त्या आंदोलनात ‘आप’चाही सहभाग राहील, अशी घोषणा आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी जाहीर सभेत केली.

शहरातील जयप्रकाश नारायण चौकात मंगळवारी सायंकाळी ‘आप’ची जाहीर सभा झाली. त्या वेळी दमानिया बोलत होत्या. परिवर्तनाच्या चळवळीतून निर्माण झालेली आम आदमी पार्टी राज्यात भयमुक्त व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच राज्यातील सर्वच पक्षांचे नेते भ्रष्ट असल्याचा आरोप करत त्यांनी शरद पवार, अजित पवार, नारायण राणे, छगन भुजबळ, नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी हा सर्वाधिक गुंड असलेला पक्ष असल्याचेही त्या या वेळी म्हणाल्या.

दरम्यान, जळगाव आणि देशातील भयावह वास्तव बदलण्यासाठी ‘आप’च्या माध्यमातून चांगला पर्याय मिळाल्याने यापुढे या पक्षासाठी पूर्णवेळ काम करण्याची घोषणा शेखर सोनाळकर यांनी केली. तसेच हल्लीचे शासन आणि विरोधी पक्ष हे सारखेच असून, त्यांनी देश विकायला काढला आहे. या स्थितीत ‘आप’चा पर्याय योग्य असल्याचे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. डॉ.संग्राम पाटील यांनी जिल्ह्यातील सध्याची राजकारणाची स्थिती, तर सुभाष तंवर आणि संजीव साने यांनी पक्षसंघटनाबाबत मनोगत व्यक्त केले.

‘तडजोड करून देणारे नेते
जिल्हा बॅँकेतील संगणक घोटाळ्यात संचालकांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करत विरोधी पक्ष नेत्यांनी पैसे भरून मोकळे होण्याचा मार्ग सांगितला. तडजोडीच्या प्रकारामुळे कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक हेच कळत नाही. त्यांनी एकही प्रकरण लावून धरले नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील सीमारेषा पुसली गेली आहे. जळगाव महापालिकेची स्थिती आर्थिकदृष्ट्या फारच खालावली आहे. येथे स्थानिक सक्षम नेतृत्व नाही. आम आदमी पार्टीत आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी पक्षाला पूर्ण वेळ देणार आहे. शेखर सोनाळकर, सदस्य, आम आदमी पार्टी.

स्मारकापेक्षा किल्ल्यांची डागडुजी
शिवाजी रयतेचे राजे होते. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गड, किल्ल्यांचे वैभव सांभाळा, हा वारसा जपण्यासाठी त्यांची डागडुजी करण्यावर ‘आप’चा भर असेल. अस्तित्वात नसलेल्या समुद्रातील पुतळ्याचे स्वप्न दाखविण्यात अर्थ नाही आणि बनविण्यातही मुळीच रस नाही. अशा शब्दात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी संजीव साने यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षापुढे प्रचंड समस्या निर्माण होणार आहेत. अनेक राजकीय पुढारी त्यांच्या कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये भरणा करून राडा करणार आहेत, कोठे मारामार्‍या, हल्ले होतील. येत्या निवडणुकांकडे पाहून पक्षाचे सदस्य झाले असले तरी कार्यकर्त्यांची निवड कसोटीनेच होईल. राज्याचा समतोल विकास हे पक्षाचे मुद्दे राहतील. - संजीव साने.

बैठकीला यांची होती उपस्थिती
बैठकीला अंजली दमानिया, प्रा.गौतम निकम, सुभाष तंवर, राहुल भारती, डॉ.संग्राम पाटील, प्रतिभा शिंदे, शेखर सोनाळकर, डॉ.प्रताप जाधव, डॉ.सुनील गाजरे, भुवनेश्वरसिंग, डॉ.राजेश पाटील, वासंती दिघे, संदीप काबरा, डॉ.सचिन निकुंभ, अनिल मणियार, अँड.उषा यादव, डॉ.किशोर माळी उपस्थित होते. अंजली दमानिया यांनी पक्ष संघटना, आगामी निवडणुका, पक्षाची तयारी याबाबत मार्गदर्शन केले.