जळगाव- ‘बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, आम्हाला तुम्ही हवे आहात म्हणूनच गाडी चालवताना हेल्मेट घाला, मोबाइलवर बोलू नका, गुटखा खाऊन गाडी चालवू नका. तुमचा अपघात झाला, त्यात तुमचा मृत्यू झाला तर माझे शिक्षण कोण करेल.’ असे भावनिक आवाहन चिमुकल्यांनी आपल्या वडिलांना पत्राद्वारे केले आहे. आशा फाउंडेशनतर्फे शहरातील शाळांमध्ये ‘पत्रास कारण की’ हा आगळा-वेगळा पण विचार करायला लावणारा उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांना पत्र लिहून त्यांना ट्रॅफिकबाबत सूचना करायच्या होत्या. गाडी कशी चालवावी व त्यांचे पालक ट्रॅफिकचे नियम पाळतात का नाही पाळत, त्यांनी काय करायला हवे हे मुलांनाच त्यांच्या भावना पत्रात लिहायला लावल्या व हे पत्र वडिलांना पाठवण्यात आले. 24 ते 30 जुलैदरम्यान शहरातील 22 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यात साधारणत: तीन हजार विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिली. आशा फाउंडेशनतर्फेच पत्रे देण्यात आली. नंतर ती जमा करून पाठवण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची पत्रे चुकीच्या पत्याअभावी परत आली, ती पत्रे परत विद्यार्थ्यांना देऊन पालकांना देण्यात येणार आहेत.
या चिमुकल्यांनी त्यांच्या मनातील भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतून ही पत्रे लिहिली गेली आहेत. यासाठी आशा फाउंडेशनचे गिरीश कुळकर्णी, सुजाता बोरकर, मधुकर पाटील, प्रदीप पवार, तुषार सहारकर, अदिती कुळकर्णी, वसुधा शिगवण, अपूर्वा वाणी, संध्या पाटील, वृशाली कुळकर्णी, मीना भामेरे, विद्या कुळकर्णी, मोतीलाल पाटील, संध्या कुळकर्णी यांनी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
या गोष्टी आल्या समोर
पत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार, तीर्थरूप वडील, तुमचा लाडका, तुमची लेक असे म्हणत आमचे ऐकाल ना? असे विचारले आहे. त्यांनी ट्रॅफिकबाबत गाडी चालवताना हेल्मेट वापरा, गाडी हळू चालवा, माझ्याशी किंवा आईशी गाडी चालवताना बोलू नका, एका हाताने चालवू नका, वळणावर हॉर्न वाजवा, विरुद्ध दिशेने जाऊ नका, सिग्नल तोडू नका, गाडीची कागदपत्रे सोबत ठेवा तसेच रस्त्यामध्ये गाडी थांबवून कोणाशीही बोलू नका या सूचना केल्या आहेत. ज्या मुलांचे पालक नियम पाळतात त्यांनी ‘पप्पा तुम्ही सगळे कायदे पाळतात, परंतु हे असेच पाळत राहा! असे मला प्रॉमिस करा’ असे म्हटले आहे.
सवयींविषयी सर्वाधिक सूचना
या सर्व पत्रांमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांनी ‘रोगिष्ट’ खाऊ नये, म्हणजे गुटखा / तंबाखू खाऊन गाडी चालवू नये. त्याचप्रमाणे दारू पिऊन गाडी चालवू नये, यामुळे अपघात होऊ शकतो, असे सांगितले आहे. अपघात झाल्यास वडिलांना इजा झाली तर आम्हाला दु:ख होईल, तुमचा मृत्यू झाला तर आम्ही कसे जगणार? आई व आम्ही तुमची घरी वाट पाहत आहोत, आजी-आजोबा वाट पाहत असतात, आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमच्याबद्दल आम्हाला काळजी वाटते असे म्हटले आहे. रिक्षावाल्या काकांनाही पत्र लिहिण्यात येऊन काका तोंडात ‘बोकणा’ भरू नका असेही एका पत्रात म्हटले आहे.
पालकांना वाटले आश्चर्य
आम्ही हा उपक्रम राबवण्याचे ठरवले तेव्हा मुलांना सांगितले की, पालकांना आपल्याला सरप्राइज द्यायचे आहे. त्यामुळे पालकांना हे माहितीच नव्हते. मोठ्या माणसापेक्षा लहान मुलांनी सांगितले तर ते लवकर समजते. मुलांना जे वाटले ते त्यांनी पत्रात उतरवले. मुलांचे किती बारीक लक्ष असते हे यावरून निदर्शनास आले. गिरीश कुळकर्णी, संचालक आशा फाउंडेशन