आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abalner Seat To Ncp From Congress For Upcoming Election

अमळनेरची जागा राष्ट्रवादीकडे जाणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - सातत्याने २५ वर्षांपासून जागा गमवणाऱ्या कॉँग्रेस पक्षाकडून अमळनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्यात तसे संकेत देण्यात आले. तिकीट निश्चिती कोणालाही होईल, मात्र आघाडीशी ठाम राहण्याचा निर्णय यात घेण्यात आला.

आघाडीच्या वतीने रविवारी अन्नपूर्णा मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात अाले हाेते. राज्यपातळीवर काही ठिकाणी जागा बदलाचे संकेत असल्याने त्या पार्श्वभूमीवर आमदार साहेबराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होत असल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीकडून तिकीट मागणाऱ्यांपैकी जिल्हा बॅँक संचालिका तिलोत्तमा पाटील या व कॉँग्रेसतर्फे इच्छुक असलेले तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शिंदे हे मेळाव्यास उपस्थित होते. मात्र, पक्षनिर्णय जाहीर होणार असल्याने केवळ त्याबाबत ज्याला उमेदवारी मिळेल त्याचाच प्रचार करू, असे या वेळी जाहीर करण्यात आले.
या मेळाव्यास ज्येष्ठ नेते भैयासाहेब पाटील, रामभाऊ संदानशिव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कॉँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, पारोळा पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत पाटील, अमळनेर पंचायत समितीच्या सभापती ललिता बैसाणे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. या वेळी अॅड. रज्जाक शेख, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांच्यासह वरील नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

काँग्रेसची जागा जाणार
कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी परदेशातून परत आल्यावर आघाडीच्या प्रस्तावावर सही करतील त्यानंतर फेरबदलाची घोषणा होईल. वारंवार अपयश येणाऱ्या जागांच्या फेरबदलाचे निर्णयही झाले आहेत, त्यामुळे अमळनेरची जागाही फेरबदल होऊ शकते. हे ध्यानी घेत सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. सातत्याने १९८५ पासून सतत पराभव पत्कारणाऱ्या कॉँग्रेसची अमळनेरची जागा आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे.
आमदारांची राष्ट्रवादीत एन्ट्री
सोमवारी आमदार साहेबराव पाटील यांना मुंबई येथे राष्ट्रवादीने बोलवले आहे. याबाबत उद्या पक्षात त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे, त्यानंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येईल. असे संकेत आजच्या मेळाव्यात मिळाले आहेत. याबाबत आमदार पाटील यांनीही जाहीरपणे पक्षप्रवेश करीत असल्याचे सांगितले.