आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम तरुणांवर होतो अन्याय - अबू आझमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मुस्लिम तरुणांना खोट्या आरोपाखाली अटक केली जाते. त्यांच्यावर अत्याचार केला जातो. पुण्याच्या जेलमध्ये निष्पाप तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. त्या बिहारच्या तरुणावरील गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्याला शिक्षा दिली. तर दुसरीकडे सरबजितसिंगला पाकिस्तानमध्ये फाशी दिल्यानंतर देशभर आवाज उठतो. त्याच्या परिवाराचे सांत्वन होते. मुस्लिमांबरोबर असा भेदभाव केला जातो. भेदभाव करणार्‍या काँग्रेस आणि प्रशासनाला जागा दाखवा, असे आवाहन भिवंडीचे आमदार तथा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी केले.

शहरातील तिरंगा चौकात बुधवारी रात्री समाजवादी पार्टीतर्फे जाहीर सभा झाली. या वेळी ते बोलत होते. मंचावर विलास खरात, अकिल अन्सारी, जमील मन्सुरी, अमीन पटेल, इनाम सिद्दीकी, अस्लम अब्बास, सय्यद साबीर, मुफ्ती हसन, योगेश कंगले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अबू आझमी पुढे म्हणाले की, मोदी व युवक काँग्रेसच्या रॅलीसाठी पैसे दिले जातात. मात्र, आज पैसे न देता समस्याग्रस्त तरुण व नागरिक सभेला उपस्थित राहिले आहेत. ज्यांनी दंगली घडवल्या, ज्यांनी मशीद पाडली, ज्यांनी घरे जाळली अशांना शहरात प्रवेश दिला जातो ; परंतु मला रोखले जाते. मात्र, जे प्रक्षोभक भाषणे करतात त्यांना शहरात प्रवेश करू दिला जातो, असे दुटप्पी धोरण शासन अवलंबते. काँग्रेस शासनाने हिंदू-मुस्लिम अशी दोन घरे तयार केली आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी मुस्लिमांवर अन्याय करत आले आहेत. शहरात मुस्लिम मोहल्ल्यात रस्ते नाहीत, वृद्धांना काम करावे लागते, स्वच्छता नाही. मात्र शहरात दुसरीकडे उंच इमारती आहेत. स्वच्छता आहे, असा भेदभाव का केला जातो. त्यामुळे शहराचा असमतोल विकास होतो. शहरातील दंगलीत एका गटावर अन्याय तर दुसर्‍याला न्याय मिळतो. पोलिसांनी अत्याचार केला ; परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उत्तर प्रदेश राज्यात झालेल्या दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला व पोलिसांना शिक्षा झाली आहे. परंतु राज्यात अशी एकही घटना नाही.

कार्यक्रमात बोलताना काँग्रेसमधून समाजवादी पार्टीत प्रवेश केलेल्या विलास खरात यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये काम करीत असताना भरपूर काही उपभोगले. मात्र, ज्यांच्यासाठी सरकार असते त्या सर्वसामान्यांना काहीच मिळाले नाही. त्यांच्यासाठी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. अल्पसंख्याक समाजाला फक्त समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवावा, असा प्र त्यांनी उपस्थित केला. या वेळी कल्पना गंगवार यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरात दंगलीनंतर प्रथमच झालेल्या अबू आझमी यांच्या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्तही या वेळी चोख ठेवण्यात आला होता.