आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident In Bhusawal, Athiti Hotel Owner Prasanna Dev Death

खड्ड्यांमुळे ‘प्रसन्न’ देवाघरी; पालकमंत्र्यांच्या शहरात ढिम्म प्रशासन हालेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे भुसावळातील रस्ते शेवटच्या घटका मोजत आहेत. हेच खड्डेमय रस्ते आता शहरवासीयांच्या जीवावर उठले आहेत. रविवारी रस्त्यावरील खड्डा चुकवताना झालेल्या अपघातामध्ये हॉटेल अतिथीचे मालक प्रसन्न विष्णू देव (वय 45) यांचा बळी गेला. वर्षभरातील हा तिसरा बळी ठरला.

जामनेर रोडवरील अतिथी हॉटेलचे मालक प्रसन्न विष्णू देव रविवारी रात्री 11 वाजता दुचाकी (एमएच-19-एव्ही-0405)ने शांतीनगरातील निवासस्थानाकडे निघाले होते. डी.एस.हायस्कूलसमोर रस्ता दुभाजकाच्या कॉर्नरजवळील खड्डा चुकवताना त्यांची दुचाकी घसरली. खाली पडल्याने देव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. बाजूलाच उभ्या असलेल्या काही मंडळींनी देव यांच्या खिशातून पडलेल्या मोबाइलद्वारे त्यांच्या घरी अपघाताची माहिती दिली. यानंतर डॉ.नीलेश महाजन यांच्या साईपुष्प हॉस्पिटलमध्ये देव यांना नेण्यात आले. मात्र, डॉ.महाजन यांनी जळगावला हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर देव यांना तातडीने जळगाव येथे डॉ.राजेंद्र जैन यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डोक्याला जबर मार लागल्याने सीटीस्कॅन केल्यानंतर रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रथितयश हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिक प्रसन्न देव यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. भुसावळ ऑप्टीकलचे राजू देव यांचे ते लहान बंधू होत.

स्नेहीजनांची गर्दी
रोटेरियन प्रसन्न देव यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोमवारी सकाळी कोटेचा कॉलेजजवळील त्यांच्या निवासस्थानी आप्त आणि स्नेहीजनांची गर्दी झाली. रोटरी परिवाराशी संबंधित असल्याने शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत मंडळींनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

मुख्याधिकारी अनिल जगताप यांना प्रश्न
प्रश्न : शहरातील रस्ते दुरूस्ती का रखडली?
उत्तर : संततधार पावसामुळे दुरूस्तीची कामे करण्यात अडचणी आहेत.
प्रश्न : खड्ड्यांमध्ये साधा मुरूम, खडी टाकलेली नाही?
उत्तर : पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये टाकलेला मुरूम नियमित होण्यासाठी वेळ लागतो. त्याचा चिखल होतो.
प्रश्न : अपघातात बळी जाऊनही पालिका संवेदनशील नाही का?
उत्तर : तसे काहीही नाही. आम्ही सुद्धा समाजाचा एक घटकच आहोत.
प्रश्न : पालिकेकडे रस्ता अनुदान असूनही कामे का थांबली?
उत्तर : कामे एप्रिल, मे महिन्यातच होणे गरजेचे होते. मात्र, काही अडचणींमुळे कामे झाली नसतील.
प्रश्न : रस्ते दुरूस्तीला सुरूवात कधी होणार?
उत्तर : शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला मंगळवारपासून सुरूवात होईल. लवकरच हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहील.
प्रश्न : रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेला किती अनुदान मिळाले आहे?
उत्तर : अनुदानाची माहिती या क्षणी उपलब्ध नाही. माहिती उपलब्ध झाल्यावर ती देण्याचा प्रयत्न राहील.