आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: मालवाहू रिक्षाचा धक्का लागल्याने दुचाकीचालक आला ट्रकखाली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील बेशिस्त वाहतुकीने गुरुवारी सकाळी 9 वाजता आणखी एक बळी घेतला. जळगाव रोडवरील गुरुद्वारासमोर ट्रकने चिरडल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील असिस्टंट लोकोपायलट जागीच ठार झाला. अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

झोनल ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षणार्थी व जितेंद्र कॉलनीतील रहिवासी असिस्टंट लोकोपायलट जितेंद्र प्रेमचंद नारखेडे (वय 42) नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मोटारसायकल (एम.एच.19, एसी-5898)ने घरुन निघाले होते. जळगाव रोडवरील गुरुद्वारासमोर रस्त्याच्या आउटसाइडला उभ्या असलेल्या मालवाहू रिक्षाचा धक्का लागल्याने त्यांची मोटारसायकल घसरली. यामुळे नारखेडे रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे शहरातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरांतर्गत भागातील अवजड वाहनांची वाढलेली रहदारी, आणि रिंगरोडचा रेंगाळलेला प्रश्न, आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

अपघाताचे वृत्त कळताच रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी पालिका दवाखान्यात गर्दी केली. नारखेडे रेल कामगार सेनेच्या मंडळ उपाध्यक्षपदी कार्यरत होते. सर्वांशी मिळून राहणारा सहकारी आणि सहकार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारा पदाधिकारी, अशी त्यांची ओळख होती. शहर पोलिस ठाण्यात नगरसेवक वसंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर तपास करत आहेत. हवालदार शांतीलाल बोरसे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, शहरातील गजानन महाराज मंदिर ते जळगाव रस्त्याला रिंगरोड म्हणून ओळखले जाते. मात्र, चार वर्षांपासून पालिकेचे या मार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. मध्यंतरी रिंगरोडचे काम सुरू झाले होते. शहरांतर्गत भागातून जाणारी वाहने या मार्गावरून वळवली जातील, असे आभासी चित्र निर्माण झाले होते. मात्र, अजूनही या मार्गाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. रिंगरोड होत नसल्याने शहरातून जाणार्‍या यावल मार्गावर अपघातांच्या घटना कायम आहेत. यावल आणि जळगावकडून येणार्‍या दोन्ही बाजूने यावल रस्त्यावर ठिकठिकाणी अवजड वाहने थांबलेली असतात. ट्रक, कंटेनरसारख्या मालवाहू वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे दुचाकी वाहनांसह पादचार्‍यांनाही जीव मुठीत धरुनच मार्गक्रमण करावे लागते. याच मार्गावर सेंट अलॉयसीस आणि के.नारखेडे विद्यालय या शाळा आहेत. कोटेचा विद्यालयातील विद्यार्थ्यांची सुद्धा परिसरात वर्दळ असते. अवजड वाहनांची वाढती रहदारी अपघातांना आमंत्रण देणारी आहे. शाळांच्या परिसरात गतिरोधकाची मागणी असली तरी पालिकेचे याविषयाशी देणेघेणे नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागल्यास दोन्ही बाजूने येणारी अवजड वाहने अंतर्गत भागातून न जाता शहराबाहेरुन जातील. वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचा धोका कमी होईल. ही जबाबदारी पालिकेची असली तरी शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

शवविच्छेदनासाठी झाली धावपळ
जळगावरोडवर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नारखेडे यांचा मृतदेह पालिका दवाखान्यात आणण्यात आला. त्या वेळी रेल कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. दरम्यान, पालिका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन होणार नाही, असे सांगण्यात आले. परिणामी नारखेडे यांच्या नातेवाइकांनी मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

संघटनेचा खंदा कार्यकर्ता हरपला
नारखेडे यांनी रेल कामगार सेनेसाठी खूप कष्ट घेतले होते. सहकार्‍यांच्या मागण्या आणि हक्कांसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांशी नियमाने भांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे रेल कामगार सेनेला मोठा धक्का पोहोचला आहे. ललितकुमार मुथा, मंडळ अध्यक्ष, रेले कामगार सेना, भुसावळ