आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात एकाचवेळी सहा अंत्ययात्रा, शहरावर शोककळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- नागपूरजवळील अपघातात ठार झालेल्या म्युनिसिपल पार्कमधील सहा जणांची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्याने अवघे शहर सुन्न झाले. सोमवारी रात्री लक्झरीने चिरडल्याने रुग्णवाहिकेमधील सहा जणांचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मृतदेह भुसावळात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील रहिवासी अजयकुमार भगवानदास यादव (वय 55), त्यांच्या पत्नी प्रमिला यादव (वय 50), भाऊ विजयकुमार भगवानदास यादव (वय 50), वहिनी नलिनी विजयकुमार यादव (वय 45), मुले मंगेश अजयकुमार यादव (वय 28), रुपेश अजयकुमार यादव, मुलगी अंकिता अजयकुमार यादव आणि पितांबर नामदेव पाटील (वय 50) असे आठ जण सोमवारी दुपारी 2.30 वाजेचे सुमारास रुग्णवाहिका (क्रमांक एमएच-19-एम-9998)ने नागपूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान कोंढाळीजवळील खुर्सापार शिवारात नागपूरहून धुळ्याकडे येणार्‍या लक्झरी (क्रमांक एमएच-31-क्यू-6900)ने रुग्णवाहिकेला अक्षरश: चिरडले. या अपघातामध्ये अजयकुमार यादव, त्यांच्या पत्नी प्रमिला, भाऊ विजयकुमार, वहिनी नलिनी, मुलगा मंगेश आणि पितांबर पाटील या सहा जणांचा मृत्यू झाला. तर रुपेश आणि अंकिता हे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

मेहनती पितांबर पाटील
पितांबर पाटील अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या ओम टेन्ट हाऊसचे संचालक होते. अतिशय मेहनती व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे.

नागपुरात शवविच्छेदन
सोमवारी रात्री 11 वाजेचे सुमारास अपघाताची बातमी कळताच संपूर्ण म्युनिसिपल पार्क सुन्न झाला. नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी शहरवासीयांनी यादव यांच्या घरासमोर गर्दी केली. दरम्यान, मंगळवारी सकाळी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री 11 वाजेचे सुमारास भुसावळात आणण्यात आले. एकाचवेळी सहा अंत्ययात्रा निघाल्याने परिसर हेलावला. पालकमंत्री संजय सावकारे, नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नगरसेवकांनी अजयकुमार यादव कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यादव यांचे नातेवाईक झाले निशब्द
शिवचरणप्रसाद, अजयकुमार, विजयकुमार आणि राजकुमार यादव या चार भावांचे म्युनिसिपल पार्कमध्ये वास्तव्य होते. यापैकी अजयकुमार आणि विजयकुमार यांचा अपघातात मृत्यू झाला. यादव पान सेंटरसाठी हे बंधू प्रसिद्ध आहे.

अजयकुमार यादव भुसावळ रेल्वेमध्ये गार्ड होते. त्यांच्या पत्नीचे नाव प्रमिला असून मंगेश, रुपेश ही दोन मुले आणि तीन मुली अशी अपत्ये आहेत. यापैकी प्रवासी गाडीचालक मंगेशचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर रुपेश आणि अंकिता जखमी झाले. विजयकुमार यादव यांनी काही वर्षांपूर्वी रेल्वेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. त्यांच्या पत्नीचे नाव नलिनी असून दिनेश, राहुल ही दोन मुले आणि मुलगी ममता, अशी तीन अपत्ये आहेत.

बहीण-भाऊ जखमी
अपघाताचे वृत्त समजताच नातेवाइकांनी यादव यांचे निवासस्थान गाठले.
नागपूरकडे जाताना अजयकुमार यांनी दोन्ही मुले मंगेश, रुपेश आणि मुलगी अंकिता यांना सोबत घेतले होते. अपघातामध्ये मंगेशचा मृत्यू झाला. तर जखमी रुपेश आणि अंकिता मृत्यूशी झुंज देत आहे. नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार झाले.

जखमींना आणले भुसावळात
अपघातामध्ये जखमी झालेले रुपेश आणि अंकिता या बहीण-भावाला नागपूर येथून स्वतंत्र रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी भुसावळात आणण्यात आले. मृतदेह आणि जखमींना भुसावळात आणताच त्यांच्या आप्तेष्टांनी एकच हंबरडा फोडला.