आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Dry Day, Drinker, Divya Marathi, Jalgaon

‘ड्राय डे’ला मद्यधुंद चालकाने घेतला बालिकेसह वृद्धेचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायत्री पाटील - Divya Marathi
गायत्री पाटील

जळगाव - पिंप्राळा येथील चौधरीवाडा भागात सोमवारी दुपारी 1.30च्या सुमारास वृद्ध महिला आणि बालिकेला कारने जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान दोन तासांच्या अंतराने त्या दोघींचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने मद्यधुंद कारचालकाला बेदम मारहाण करीत कारची मोडतोड केली. सोमवारी ‘ड्राय-डे’ असतानाही कारचालक दारू प्यालेला असल्याचे स्पष्ट झाल्याने एकंदरीतच पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गायत्री पाटील सावित्रीबाई सोनवणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंप्राळ्यात मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला सावित्रीबाई मकडू सोनवणे (वय 65) आणि गायत्री रवींद्र पाटील (वय 8) या उभ्या होत्या. याचवेळी त्यांच्या पाठीमागून एक कार (एमएच 04 एम 3764) वेगाने पुढे गेली मात्र पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा नसल्याने चालकाने वेगातच कार रिव्हर्स घेतली. त्यावेळी त्याचे नियंत्रण सुटल्याने मागे उभ्या असलेल्या सावित्रीबाई आणि गायत्री यांना जोरदार धडक बसली. अपघातात दोघी जखमी झाल्या. या कारचा चालक इद्रीस बुधा कुरेशी (वय 28, रा.नागपूर) मद्यधुंद असल्याचे पाहून घटनास्थळावरील जमाव संतापला. जमावाने चालकाला बेदम मारहाण करीत कारची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून संताप व्यक्त केला. दरम्यान काहींनी जखमी गायत्री आणि सावित्रीबाई यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले . गायत्रीच्या डोक्याला आणि उजव्या हाताला दुखापत झाली होती तर सावित्रीबाई यांच्या दोन्ही हातांसह छातीवर मार लागला होता. उपचार सुरू असतानाच 4.15 वाजता गायत्री तर सायंकाळी 6.00 वाजता सावित्रीबाई यांची प्राणज्योत मालवली.


सीटीस्कॅन मशीनची आठवण
गायत्रीच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचे सीटीस्कॅन करणे गरजेचे होते मात्र सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंद असल्याने ते शक्य झाले नाही. डॉक्टरांनी गायत्रीची आजी यमूबाई यांना खासगी रुग्णालयातून सीटीस्कॅन करण्याचे सांगितले. खासगी रुग्णालयाचा उपचार खर्च परवडणारा नसल्यामुळे यमूबाई हताश झाल्या. त्यामुळे गायत्रीला झालेल्या दुखापतीचे योग्य निदान झाले नाही. अखेरीस तिने जगाचा निरोप घेतला.


‘ड्राय-डे’लाही नशा
अपघात घडवणारा कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. सोमवारी ‘ड्राय-डे’ असतानाही त्याने दारू कुठे घेतली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाने ‘ड्राय-डे’च्या दिवशी दारूबंदीवर पूर्णपणे नियंत्रण न ठेवल्याचे हे मोठे उदाहरण आहे. या निष्काळजीपणामुळेच आज दोघींना प्राण गमवावे लागले.


वर्षभरात दुसरा घाला
मृत गायत्री मानवसेवा केंद्राच्या शाळेत बालवाडीच्या वर्गात शिकत होती. सुटीमुळे ती पिंप्राळा येथे आजीकडे राहायला आली होती. आठ महिन्यांपूर्वीच तिचे वडील रवींद्र पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गायत्रीपेक्षा एक मोठी मुलगी आणि एक मुलगा यांची जबाबदारी गायत्रीची आई कविता यांच्यावर आहे. त्यामुळे कविता पाटील ह्या हातमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात असलेल्या पाटील कुटुंबावर काळाचा हा दुसरा आघात आहे.


चालक, जखमी एकाच वॉर्डात
अपघातानंतर सामान्य रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात गायत्री आणि सावित्रीबाई यांच्यावर उपचार सुरू होते. काही वेळातच कारचा चालक कुरेशी हाही याच वॉर्डात त्यांच्याच शेजारी उपचारासाठी दाखल झाला. नागरिकांनी त्याला बेदम चोप दिल्यामुळे तो जखमी झाला आहे. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये आणखी एकजण बसलेला होता मात्र अपघातानंतर उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत त्याने पळ काढल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.