आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याजवळ अ‍ॅसिड हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तालुक्यातील सोनेवाडी गावातील माजी उपसरपंच शिवाजी म्हस्के याने तिघांच्या मदतीने कधीकाळी आपला मित्र असलेल्या बापू शेळकेवर अ‍ॅसिडसदृश द्रव्य टाकून कुर्‍हाडीने हल्ला केला. पूर्ववैमन्यासातून हा प्रकार घडला. या घटनेत शेळकेंसह एक जण होरपळला आहे. धुळे तालुका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

सोनेवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बापू उत्तम शेळके (वय 35) व माजी सरपंच शिवाजी भिवसन म्हस्के यांच्यात वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ असून शुक्रवारी त्यावर कामकाज होते. त्यामुळे बापू शेळके हे गावात राहणारे आपले नातलग सहादू बाबुलाल गोलांगे आणि अशोक गणपत चव्हाण यांच्यासह मोटारसायकलवरून धुळ्याकडे येण्यास निघाले होते. अंबिकर देवीच्या मंदिराजवळून जात असताना शिवाजी म्हस्के, तुकाराम भिवसन म्हस्के, राजेंद्र दगा वाबळे, पिंटू मुरलीधर वाबळे यांनी मोटारसायकल अडवली. या वेळी गोलांगे हे त्यांची समजूत काढण्यासाठी उतरले. परंतु म्हस्के व इतर काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या वेळी शिवाजी म्हस्के यांने बादलीत सोबत आणलेले अ‍ॅसिडसदृश द्रव्य पळ काढू पाहणार्‍या शेळके यांच्या अंगावर मागील बाजूने फेकले. यात होरपळल्याने शेळके जागीच खाली कोसळले. या वेळी म्हस्केने त्यांच्या मानेवर कुर्‍हाडीनेही वार केला.

या घटनेत शेळके यांच्या डोक्याचा मागील काही भाग, मान, पाठ तसेच कंबरेपर्यंत अ‍ॅसिड उडाल्यामुळे ते जबर जखमी झाले आहेत. या वेळी दुचाकीवर बसलेले अशोक चव्हाण यांच्यावरही काहीअंशी अ‍ॅसिड पडल्याने ते देखील काही प्रमाणात भाजले आहेत. या घटनेनंतर शिवाजी म्हस्के याने घटनास्थळावरून पळ काढला. तर अशोक चव्हाण, सहादू गोलांगे यांच्या मदतीने शेळके यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर उपनिरीक्षक दिलीप नेतकर यांनी रुग्णालय गाठले. धुळे तालुका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्रत्यक्षदश्री म्हणतात: म्हस्केचा आक्रमक पवित्रा पाहून ‘बापू पळ.. पळ,’ असे ओरडून शेळकेंना पळवण्याचा प्रयत्न करीत होता. हल्ल्यानंतर म्हस्के पसार झाला आहे. तर आवाज ऐकून इतर गावकरी धावत आले, अशी माहिती सहादू गोलांगे आणि अशोक चव्हाण यांनी दिली.

काय आहे वाद ?
बापू शेळके व शिवाजी म्हस्के यांच्यात कधीकाळी मैत्री होती. सन 2009 मध्ये एकाच गटातून दोघे ग्रामपंचायतमध्ये निवडून आले. आरक्षणानुसार ठाकरे नामक महिलेची सरपंच म्हणून तर म्हस्केची उपसरपंच म्हणून निवड झाली होती. महिला सरपंचाच्या अपरोक्ष म्हस्केकडे सत्तेच्या चाव्या होत्या. गावातील विकासकामे, त्यांच्यावरील खर्च आणि होणारे आरोप यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढून पोलिसात ही पोहोचला होता, अशी माहिती गावकर्‍यांनी दिली.