आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरातील मुदत संपलेल्या होर्डिंग्जवर उगारला कारवाईचा बडगा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात सर्वच भागात होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. यातील बरेचसे विनापरवानगी तर काहींची मुदत संपलेली आहे. ते काढण्यात यावेत, अशी सूचना दिल्यावरही ते काढल्याने महापालिकेतर्फे अखेर शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत होर्डिंग्ज काढून जप्त करण्यात आले.

शहरातील जवळपास सर्वच चौकात कमीअधिक प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरही असे होर्डिंग्ज, बॅनर लावलेले आहेत. त्यात राजकीय, सण, उत्सवांच्या होर्डिंग्जचा समावेश आहे. त्यात तात्पुरत्या स्वरूपातील फलक तसेच व्यावसायिक जाहिरात एजंट यांचाही समावेश आहे. ते लावण्यासाठी महापालिकेच्या जाहिरात विभागाकडे परवानगी घ्यावी लागते. लेखी अर्ज सादर करून त्याची फी भरावी लागते. त्याचप्रमाणे त्या होर्डिंग्जवर प्रकाशकाचे नाव, मुदत दिनांक टाकणे आवश्यक आहे. तर ज्या हद्दीत ते लावायचे आहे, त्या भागातील पोलिस ठाण्याचा ना हरकत दाखला अर्जासोबत लावणे गरजेचे आहे; परंतु परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण शहरात अतिशय कमी आहे.
मुख्य चौकात होर्डिंग्जची गर्दी आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. परवानगी नसलेले आणि मुदत संपलेले होर्डिंग्ज, बॅनरवर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाचेही आदेश आहेत. त्याचा अहवाल न्यायालयाला नियमितपणे पाठवावा लागत आहे. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्ते, चौकातील होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. त्यात महापालिका चौक, आग्रारोड, जे.बी. रोड, दत्त मंदिर, साक्रीरोड, बारापत्थर चौक या ठिकाणी कारवाई करण्यात येऊन ते जप्त करण्यात आले. या वेळी १७ ते १८ होर्डिंग्ज, बनर जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे काल गुरुवारीही शहरात कारवाई करण्यात आली होती. या दोन दिवसांत जवळपास २५ होर्डिंग्ज जप्त करण्यात आले. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, आझादनगर पोलिस ठाणे हद्द देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील होर्डिंग्जवर उद्या शनिवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.