आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयावर तिसरी शस्त्रक्रिया होऊनही 78 व्या वर्षीही घटला नाही उत्साह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सुमारे 17 वर्षांपूर्वी मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस जायबंदी झाली आणि जीवावर बेतणारी शस्त्रक्रिया थेट अमेरिकेत जाऊन करावी लागली. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आणि बायपास सर्जरी करावी लागली. पुन्हा हृदय अडखळायला लागलं तेव्हा चार महिन्यांपूर्वी एन्जिओप्लास्टी केली. तरीही त्रास होतोय म्हणून दुसरी एन्जिओप्लास्टी करून तिसर्‍याच दिवशी ते जळगावात आले. 78व्या वर्षीही वयाची पर्वा न करता ते 18-18 तास स्वत:ला कामात गुंतवून घेत तरुणांची प्रेरणा बनले. ही गाथा आहे रतनलाल बाफना नावाच्या उत्साही माणसाची.

शरीराच्या एखाद्या अवयवावर शस्त्रक्रिया करावी लागली तर स्वत:च्या नशिबाला डागण्या देत हातपाय गाळून बसणार्‍यांची संख्या कमी नाही. इथे तर हृदयावर एक नाही, तीन-तीन आघात झालेले. तरीही ना आशावाद घटलेला ना उत्साहात उणीव आली.

समस्त जळगावकरच नव्हे तर सोन्याच्या व्यापारातली समस्त मंडळी त्यांना ‘आर.सी.बाफना’ नावाने ओळखते आणि जवळची मंडळी त्यांना ‘भाईसा’ म्हणतात. अवघ्या चार महिन्यांत दोनदा एन्जिओप्लास्टी झाल्याने डॉक्टरांसह कुटुंबीयांनीही आराम करायचा सल्ला त्यांना दिला; पण त्यांच्यातला उदंड उत्साह त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. त्यामुळे मुंबईहून आल्या-आल्या ते पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्मचार्‍यांत उत्साह संचारतो.

असा असतो दिनक्रम

सकाळी पाच वाजता उठणे, गो-शाळेत फिरायला जाणे, सात ते नऊ प्रातर्विधी आणि देवपूजा करून 9 वाजता शो रूममध्ये येणे, तेथे प्रार्थना आणि 5 मिनिटांचे मार्गदर्शन करून नव्या शोरूममध्येही तोच कार्यक्रम करणे. दिवसभर शोरूमच्या कॅबिनमध्ये बसून व्यवसायाकडे लक्ष देणे, मधून-मधून ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून हितगूज करणे, रात्री 9 ते 11 या वेळेत सर्व शोरूमचे हिशेब, व्यवहार डोळय़ांखालून घालणे आणि दुसर्‍या दिवसासाठी आवश्यक टिपण काढणे.

ग्राहकाभिमुखतेचे धडे

सकाळी सर्व कर्मचार्‍यांशी पाच मिनिटांचा संवाद अनेक वर्षांपासून नियमाने सुरू आहे. कधी सद्गुणांचा सल्ला तर बर्‍याचदा ग्राहकांशी कसे वागावे याचे धडे देणे; यात बाहेरगावी असतील तरच त्यात खंड पडला आहे.