आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Atul Parchure,Latest News In Divya Marathi

मराठी माणूस प्रवासात होतो धांदरट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रवास करतानाचे अनुभव विशेषत: मराठी माणसांचे अनुभव आणि गंमती-जमतींनी श्रोत्यांना पोट धरून हसवले. निमित्त होते अभिनेता अतुल परचुरे यांच्या प्रवासावरील एकपात्री कार्यक्रमाचे. कशालाही घाबरणे हा मराठी माणसाचा स्वभाव तर धांदरटपणा हा त्याचा ‘साइड इफेक्ट’ अशा शब्दात परचुरे यांनी प्रवासातील मराठी माणसाचे वर्णन केले.
कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर आणि ‘दिव्य मराठी’तर्फे प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचा ‘भटकंती जगाची गंमत ट्रॅव्हलकरांची’ हा एकपात्री कार्यक्रम शनिवारी रात्री जिल्हा बँकेच्या सभागृहात झाला. प्रवासाला जाण्यापासून ते प्रवासाचे फोटो दाखवण्यापर्यंतच्या विनोदी वर्णनांनी प्रेक्षकांना लोटपोट केले. युरोपचा प्रवास करताना त्यातील मराठी माणसांचे अनुभव त्यांनी विनोदी किस्से सांगत फुलवले. प्रवासात मराठी माणसाला पटकन ओळखायचे असेल तर अगदी सोपं आहे. प्रवासात एखादा जर सारखा आपल्या बायकोवर खेकसत असेल तर ते जोडपं मराठीच आहे, असे गृहीत धरावे.
‘दिव्य मराठी’चे युनिट हेड विलास जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी निवासी संपादक दीपक पटवे, कॉक्स अँड किंग्सचे रिजनल मॅनेजर नीरज तांबडू, जळगाव फ्रँचायझीचे प्रवीण पांडे उपस्थित होते. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
मी अतिरेकी वाटतो का?
युरोपमध्ये तीन वेळा माझ्याकडे संशयित अतिरेकी म्हणून पाहिले गेले. वारंवार सुरक्षा पोलिसांकडून माझी अंगझडती घेतली जात होती. इतर प्रवासी वगळून माझीच झडती ते घेत होते, असे परचुरे यांनी सांगितले. तो अनुभव त्यांनी विनोदी शैलीत प्रेक्षकांसमोर सादर केला असता; प्रेक्षकांनीही त्यांना तेवढीच दाद दिली. ‘खरंच मी अतिरेकी वाटतो का?’ असा प्रश्‍न त्यांनी र्शोत्यांना विचारला असता सभागृहात एकच हशा पिकला.
प्रवास काही ना काही शिकवतो
प्रवासात वेगवेगळ्या संस्कृतीची माणसे एकत्र येतात. त्यामुळे कुठलाही लांबचा प्रवास करताना प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळतेच. आपल्या आयुष्यातील भोग आपल्यालाच भोगावे लागतात. त्यासाठी कुणाची मदत मिळणार नाही; मग हे भोग हसून भोगले तर काय वाईट? हे मी युरोपियन लोकांकडून अनुभवल्याचे अभिनेता अतुल परचुरे यांनी या वेळी सांगितले.