आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होते जळगाव रेल्वेस्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी जीवघेणी कसरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धावती रेल्वे पकडण्याच्या नांदात सोमवारी भुसावळच्या एका प्रौढाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकारानंतर ‘दिव्य मराठी’च्या चमूने मंगळवारी दुपारी १२ ते १.४५ वाजेदरम्यान जळगाव रेल्वेस्थानकावर सर्वेक्षण केले. या वेळी अनेक प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करणे, धावत्या गाडीत चढणे-उतरणे, असा जीव घेणा प्रकार करताना दिसले. तसेच गाडी आल्यानंतर उतरणाऱ्या गाडी धावत असताना चढणाऱ्या प्रवाशांची धावपळ ही तर खूपच जीवघेणी होती. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्यांना डब्यांची संख्या वाढवणे गरजेचे तसेच प्रवाशांनी जीवाची पर्वा करून स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
भुसावळ येथील विजय लालचंद फालक हे सोमवारी दुपारी १२ वाजता धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी जळगाव रेल्वेस्थानकावर काय परिस्थिती आहे? प्रवासी कशापद्धतीने प्रवास करताहेत याबाबत ‘दिव्य मराठी’च्या चमूने मंगळवारी दुपारी १२ ते १.४५ या वेळेत सर्वेक्षण केले. यात अनेक धोकेदायक बाबी उजेडात आल्या. त्यावर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केल्या तर निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होईल.

गाडीतून उतरण्यावरून होतात भांडणे

गाडीपूर्णपणे थांबत नाही, तोच गाडीत चढणारे प्रवासी गेटजवळून धावपळ करायला सुरुवात करतात. थांबल्यानंतर गाडीतल्या प्रवाशांना खाली उतरू देण्याआधीच चढणारे गोंधळ करतात. त्यामुळे समन्वय साधला जात नाही. अशा वेळी प्रवाशांमध्ये भांडण होतात.
पॅसेंजरचा प्रवास धोकादायक

सकाळी दोन सायंकाळी दोन अशा चार पॅसेंजर जळगाव स्थानकावर दिवसभरातून येतात. या प्रत्येक पॅसेंजरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतात. शिवाय जागा मिळावी म्हणून गाडी येण्याच्या १५ मिनिटे आधीच फलाटाविरुद्ध दिशेने दोन रेल्वे रुळाच्या मधोमध उभे राहतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे पण पोलिस त्यांना साधी हटकण्याची तसदी सुद्धा घेत नाही.
रेल्वे पोलिसांकडून नियमित कारवाई नाही

रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्थानकावर गस्त घालतात. मात्र, ते कुणाला हटकताना दिसून येत नाहीत. कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन-तीन महिन्यांतून एकदाच मोठी कारवाई केली जाते. वेगवेगळे नियम मोडणाऱ्या सुमारे २००-३०० लोकांना एकाच वेळी पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. मात्र, हीच कारवाई जर नियमितपणे दररोज १०-१५ जणांवर केली, तर पोलिसांचा वचक निर्माण होईल. त्यामुळे कारवाईत सातत्य असणे गरजेचे झाले आहे.
‘दिव्य मराठी’च्या चमूला काय अाढळले सर्वेक्षणात
- ‘दिव्य मराठी’च्या चमूने प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येणारी डाऊनची दुपारी १२.१५ वाजेची गोवा एक्स्प्रेस, दुपारी १२.३५ वाजेला गितांजली आणि दुपारी वाजेच्या सुमारास येणाऱ्या ताप्तीगंगा या तीन रेल्वेगाड्यांचे सर्वेक्षण केले.
- प्रत्येक गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळून आले. सामान्य बोगीची अवस्था खूपच भयानक होती. गाडी स्थानकावर येण्याआधी शेकडो प्रवासी गाडीची वाट पाहत उभे होते. रेल्वे थांबवण्याआधी म्हणजे गाडीची गती कमी होताच अनेक प्रवासी गाडीतून उड्या मारताना दिसले. तसेच गाडी थांबल्यानंतर प्रत्येक प्रवासी गाडीत चढण्याची उतरण्याची कसरत करताना दिसला.
- जळगाव स्थानकावर कोणतीही रेल्वे किमान दोन मिनिटे थांबते. या दोन मिनिटात शेकडो प्रवासी उतरतात. तेवढेच पुन्हा चढतात. याच वेळी खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांची मोठी रेलचेल डब्यांमध्ये सुरू होती. अवघ्या दोन मिनिटात हे सारे शक्य करण्याच्या नांदात अनेक जण चुकतात. परिणामी त्यांना प्राण गमवावे लागत आहेत.
- गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणारे विक्रेतेही धोका पत्करून धावत्या गाड्यांमध्ये चढ-उतार करतात. विक्रेत्यांसह प्रवाशांनीच एकमेकांना साहाय्य करून सावकाश चढ-उतार केल्यास कदाचित असले प्रकार थांबतील.
- अप-डाऊन करणाऱ्यांनी देख‌ील वेळेचे नियोजन करून वेळेआधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आले तर त्यांना धावती गाडी पकडण्याची वेळ येणार नाही. तसेच सध्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे कोणत्याही डब्यात प्रवाशांना शिरण्यास जागा नसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील डब्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
- रेल्वेस्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे फक्त तीन कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर फिरताना आढळून आले. रेल्वे स्थानकावर उभी राहिल्यानंतर हे कर्मचारी एखाद्या डब्यासमोर जाऊन उभे राहत. त्यांच्या उपस्थितीमुळे फक्त संबंधित डब्यातून चढ-उतार करणारे प्रवाशीच नियंत्रणात होते. इतर डब्यांजवळ मात्र गर्दी आणि गोंधळच पहायला मिळाला.