आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Additional Cylinder, Latest News In Divya Marathi

जादा सिलिंडर घेणार्‍या 114 ग्राहकांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासनाने अनुदानित गॅससिलिंडरची संख्या वाढविल्याने एक ते दीड महिन्याच्या अंतराने तीन ते पाच सिलिंडर घेऊन मार्चअखेर 11 सिलिंडरचा कोटा पूर्ण करण्याची अनोखी शक्कल ग्राहकांनी लढवली जाते आहे. मात्र, असा फायदा उठविणार्‍या तब्बल 114 ग्राहकांना रेखा गॅस एजन्सीने नोटीस बजावली आहे.
शासनाने एप्रिल 2013 ते मार्च 2014 या वर्षात सबसिडीद्वारे नऊ सिलिंडरचा कोटा मंजूर केला होता. त्यानुसार सिलिंडर वितरण प्रणालीदेखील सुरू झाली होती. मात्र, जानेवारी 2014 मध्ये शासनाने नऊ ऐवजी 11 सिलिंडर अनुदानाने वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. या व्यतिरिक्त सिलिंडर घेण्यासाठी सद्याच्या बाजारभावाप्रमाणे नागरिकांना सिलिंडर घ्यावे लागणार आहे. परंतु ऐन जानेवारीत दोन सिलिंडरचा कोटा वाढवून मिळाला. अनुदानित उर्वरित सिलिंडरचा फायदा मार्चअखेरपर्यंत कसा घेता येईल, यासाठी नाना तर्‍हेची शक्कल लढविली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी आणि अर्धा मार्च महिन्यातील साधारणत: दीड महिन्यात काही दिवसांच्या अंतराने एका ग्राहकाने तीन ते पाच सिलिंडर घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत.
एका ग्राहकावरून प्रकार उघड
रेखा गॅस एजन्सीच्या ग्राहकांची ऑनलाइन चाचपणी करताना एका ग्राहकाने एकाच महिन्यात चार सिलिंडर घेतल्याची बाब मुंबईच्या भारत गॅस कंपनीच्या कार्यालयाच्या निदर्शनास आली. याविषयी त्यांनी रेखा गॅस एजन्सीला कळविले. त्यानुसार रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी पुढाकार घेऊन या पद्धतीने सिलिंडर नेणार्‍या ग्राहकांची यादीच तयार केली.
जादा सिलिंडरसाठी साखरपुड्याचे कारण
यातील बहुसंख्य ग्राहकांनी घरी साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याचे कारण पुढे केले. शिवाय धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदानासाठी जा6दा सिलिंडरची गरज भासली, असेही कारण काहींनी लेखी खुलाशाद्वारे केले आहे. मात्र, ग्राहकांकडून खुलाशाद्वारे दिशाभूल केली जात असल्याचा दावा रेखा गॅस एजन्सीने केला आहे. याप्रकरणी जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हेदेखील दाखल होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.