आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांमध्‍ये 273 शिक्षक ठरतील जादा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांतील मिळून जिल्ह्यात 61 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. वास्तविक पाहता मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांमधील 273 शिक्षक अतिरिक्त आहेत. याबाबत सुधारित आदेश न आल्यास त्या शिक्षकांचे टप्प्याटप्प्याने समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.

मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियमानुसार 13 डिसेंबरला सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे 31 सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या पटपडताळणीनुसार अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही रखडली आहे. कारण अध्यादेश काढल्यानंतर उपसंचालक कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीचे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी सॉफ्टवेअर दिले जाणार असून, त्यातील रकान्यात शाळांची माहिती संकलित करून उपसंचालकांना द्यायची आहे. सद्य:स्थितीत मराठी माध्यमाच्या शाळांमधील 273 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यात ग्रेडेड मुख्याध्यापक 28, पर्यवेक्षक शिक्षक एक व 244 उपशिक्षकांचा समावेश आहे. तथापि, निकषांनुसार आवश्यक शिक्षक आणि कार्यरत शिक्षकांच्या संख्येवरून 61 शिक्षकांचे समायोजनाला प्राधान्यक्रम देऊन करावे लागणार आहे. दरम्यान, मराठी आणि उर्दू माध्यमाचा एकत्रित विचार केल्यास जादा शिक्षकांचा फुगीर आकडा कमी होऊन केवळ 61 शिक्षक जादा असल्याचे चित्र शिक्षण विभागाकडून रंगवले जात आहे.

उर्दू माध्यम शाळेतील 138 शिक्षकांची पदे रिक्त
मराठी माध्यम शाळांच्या तुलनेत उर्दू शाळांची स्थिती उलट असून, मंजूर आराखड्यानुसार 1131 शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यानुसार 993 शिक्षक सध्या कार्यरत आहेत. तसेच उर्दू शिक्षकांची 138 पदे रिक्त आहेत. तसेच या विभागातील शाळांमध्ये कमी शिक्षकांवर काम सुरू आहे, तर विशिष्ट मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अतिरिक्त आहे.

नव्या अध्यादेशाप्रमाणे होणार कार्यवाही
13 डिसेंबरच्या अध्यादेशाप्रमाणे इयत्ता पहिली ते चौथीसाठी 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि पाचवी ते सातवीसाठी 35 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून माहिती गोळा करण्यात आली असून, ती माहिती भरण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सॉफ्टवेअर पुरवले जाणार आहे. त्यानंतरच शिक्षकांची स्थिती लक्षात येणार आहे.

431 सप्टेंबरच्या पटानुसार 61 शिक्षकांचे समायोजन करायचे होते; मात्र सुधारित अध्यादेशामुळे हा विषय प्रलंबित आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे सर्वार्थाने विचार करता प्रथमत: 61 शिक्षकांचे समायोजन केले जाईल. शिवाजी पाटील, शिक्षणाधिकारी