आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आधार’ सक्ती नाही; विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती नियमित मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शैक्षणिक सवलती देण्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याच्या गैरसमजुतीतून शहरातील अनेक पालक व विद्यार्थी घायकुतीला आले आहेत. त्यातून गुरुवारी महापालिकेच्या आधार नोंदणी केंद्रावर गोंधळ उडाला. प्रत्यक्षात शैक्षणिक सवलतींसाठी 2012-13 या सत्रात ‘आधार’ची सक्ती नाही. जूनपासून सुरु होणार्‍या सन 2013-14 या नव्या शैक्षणिक वर्षापासून आधार कार्डची गरज भासणार आहे. त्यासाठी शहरातील चार प्रभागात 25 मशिनद्वारे पुढील तीन महिने नोंदणी मोहीम सुरु राहणार आहे.

महापालिका हद्दीत वर्षभरानंतर आधार नोंदणीला पुन्हा सुरुवात होताच मुलांच्या नोंदणीसाठी पालकांची केंद्रांवर गर्दी होत आहे. शैक्षणिक सवलतींसाठी आधार नोंदणी सक्तीची असल्याचे सांगत शाळा व कॉलेजेस वेठीस धरत असल्यामुळे धावपळ करावी लागत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. यंदा राज्यात फक्त नंदुरबार, पुणे, ठाणे, मुंबई व वर्धा या पाच जिल्ह्यांतच प्रायोगिक तत्त्वावर 2012-13 या शैक्षणिक वर्षात आधार नोंदणीला सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग किंवा विशेष समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून आधार कार्ड सक्तीसंदर्भात लेखी आदेश नाहीत. अशा स्थितीत शाळा, कॉलेसच्या स्तरावरून पालकांना संभ्रमात टाकण्याचे काम सुरू आहे.

बॅँक खाते क्रमांक चालेल
तोकड्या यंत्रणेमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना आधारची सक्ती नाही. पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. यंदा शिष्यवृत्तीसाठी बॅँक खात्याचे विवरण दिले तरी चालेल.
-शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी

शाळांची सक्ती चुकीची
राज्यातील फक्त पाच जिल्ह्यांत सन 2012-13 या शैक्षणिक वर्षात आधार नोंदणी सक्तीची आहे. जळगाव जिल्ह्याचा त्यात समावेश नाही. त्यामुळे या वर्षी शाळापातळीवरून आधार नोंदणीची सक्ती करणे चुकीचे आहे.
-व्ही. ए. पाटील, विशेष समाजकल्याण अधिकारी