आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बट्टय़ाबोळ; शाळेतच आधार केंद्र; दुसरीच्या विद्यार्थ्यांना बसवले पहिलीच्या वर्गात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि पालिकेत आधार कार्ड प्रक्रियेबद्दल एकवाक्यता नाही. त्यामुळे हे त्रांगडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर उठले आहे. पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये सर्वसामान्यांची तब्बल एक हजार मुले शिक्षण घेतात. मात्र, काही नगरसेवकांच्या हट्टापायी याच शाळेत आधार मशीन लागले. परिणामी होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे शालेय वातावरणात कमालीचा व्यत्यय येत आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये याबाबत नाराजी असली तरी नगरसेवकांचा विषय असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

मंगळवारपासून खडका रोडवरील पालिकेच्या तीन नंबर शाळेत चार आधार कार्ड मशीन ठेवण्यात आले. गॅस सबसिडी, बँक खाते, वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे. त्यामुळे आधार केंद्रांची संख्या कमी असली तरी नागरिक आहे त्या केंद्रावर शेकडोच्या संख्येने पहाटेपासून गर्दी करतात. तीन नंबरच्या शाळेतसुद्धा पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागतात. सायंकाळी सरासरी 5 वाजेपर्यंत हे चित्र असते. गर्दीमुळे शाळेच्या आवारात दिवसभर गोंगाट असतो. याचा शालेय वातावरणावर परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी दुसरीचा वर्ग भरत होता, त्याच वर्गखोलीमध्ये आधार मशीन ठेवण्यात आले. परिणामी आता दुसरीच्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या विद्यार्थ्यांसोबत बसणे भाग पडले आहे.

आधार कार्ड वितरणाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत तहसीलदार वैशाली हिंगे यांनी विद्यार्थी हितासाठी कोणत्याही शाळेत मशीन ठेवू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, काही नगरसेवकांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे भाग पाडले. आधार कार्ड प्रत्येकाला गरजेचे आहे. त्यामुळे आपापल्या प्रभागातील नागरिकांची सोय करण्याचा हेतू, शाळेत आधार मशीन ठेवण्यामागे असला तरी विद्यार्थी हितसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. पालिकेची शाळा क्रमांक तीन सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 12 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात भरते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने शिक्षकांनी अभ्यासावर भर दिला आहे. लोकप्रतिनिधींना मात्र या मुद्दाशी देणे-घेणे नाही.

दृष्टिक्षेपात शाळा क्र. 3
>एकीकडे विद्यार्थ्यांची प्रार्थना तर दुसरीकडे नागरिकांची भलीमोठी गर्दी
>वशिला लावून आधार कार्ड काढले जाते, संतप्त नागरिकांचा गंभीर आरोप
>गोंगाटामुळे शाळेतील शिक्षक झाले त्रस्त, हजार विद्यार्थ्यांचे लक्ष उडाले
>नगरसेवकांची शाळेत उपस्थिती, मात्र शैक्षणिक वातावरणाबाबत गांभीर्य नाही

पालिकेने नियोजन करावे
आधार कार्ड मशीन लावण्याचे नियोजन तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रभारी नगराध्यक्षांनी करावे, अशा सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी संबंधितांना सूचना करू.
-संजय सावकारे, आमदार, भुसावळ विधानसभा

आमचा नाईलाज आहे
शाळेत आधार कार्ड मशीन लावल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर नक्कीच होणार आहे. सध्या दोन वर्ग एकत्र केले आहे. पालिकेनेच आमच्या शाळेची निवड केल्याने आमचा नाईलाज आहे.
-सय्यद महेमुद, मुख्याध्यापक, शाळा क्रमांक तीन

हा निर्णय पालिकेने घेतला
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेत मशीन ठेवू नये, असे बजावले होते. मात्र, आधार मशीन कुठे लावायचा हा निर्णय मुख्याधिकार्‍यांनी घेतला. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर ती पालिकेची जबाबदारी आहे.
-वैशाली हिंगे, तहसीलदार, भुसावळ