आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी आदिवासी समाज एकवटला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध पारंपरिक वाद्यासह आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजातर्फे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजातर्फे गुरुवारी शिवतीर्थावरून डोंगर बागुल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आग्रारोड, कराचीवाला खुंट, महापालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. कमलाबाई शाळेजवळ मोर्चा पोलिसांनी अडविला. तेथे सभा झाली. या वेळी डोंगर बागुल, अशोक धुळकर, राजकुमार सोनवणे, दीपक अहिरे, देविसिंग सोनवणे, बबलू मोरे, राजकुमार पावरा, राम चौरे, मनोज देसाई, अंकुश सोनवणे, कैलास पवार, ज्योती पावरा, रंजना पावरा, माजी खासदार बापू चौरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

पोलिस-मोर्चेक-यांमध्ये तू-तू मैं-मैं
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर जिल्हाधिका-यांनी निवेदन घेण्यासाठी यावे, अशी मागणी मोर्चेक-यांनी केली. त्यावरून पोलिस अधिकारी व मोर्चेक-यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला. त्यानंतर शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देण्यासाठी गेले. त्यांच्याकडेही आंदोलनकर्त्यांनी निवेदन घेण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर यावे, अशी मागणी केली.

या मागण्यांसाठी आदिवासी रस्त्यावर
० धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये.
० काहींनी ठाकूर, टोकरे कोळी, महादेव कोळी, ढोर कोळी व मल्हार कोळी समाजाचे बनावट जातप्रमाणपत्र घेऊन नोक-या मिळविल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी.
० वनजमिनींवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी.
० आदिवासींच्या जमिनी खरेदी-विक्रीसाठी जमातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येऊ नये.
० आदिवासी आमदारांच्या समितीने दर्शविलेल्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवेशाच्या विरोधास पाठिंबा देण्यात यावा.