आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विद्यार्थ्यांचा बँकेतील त्रास वाचणार18

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणार्‍या सर्व 18 शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी मिळणारे अनुदान थेट बँकेत जमा होणार आहे. सर्व 7 हजार 209 विद्यार्थ्यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते उघडण्यासाठी शाळानिहाय कॅम्प घेऊ, अशी माहिती प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांनी दिली.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह पोषाख आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पूर्वी थेट पुरवठा केला जायचा. मात्र, अनेकवेळा मिळालेल्या साहित्याचा दर्जा सुमार असल्याने विद्यार्थ्यांमधून ओरड व्हायची. विशेषत: बुट व पोषाख ढोबळ मापाचे असल्याने विद्यार्थी-पालकांमधील नाराजी कायम होती. विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही उपयोग होत नसल्याने शासनाने यावर उपाय शोधला आहे. या वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला थेट अनुदान मिळेल. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आवश्यक आहे.

सध्या शासनाकडून मिळणार्‍या सबसिडी, विविध लाभाच्या थेट योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. या मुळे बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी होणारी गर्दी कायम आहे. त्यात आता आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची भर पडली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी प्रकल्प अधिकारी दुधाळ यांनी स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांसोबत चर्चा करून खाते उघडण्यासाठी आश्रमशाळानिहाय कॅम्प घेण्याचे ठरले.

स्टेट बँकेचे सहकार्य घेणार
आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना थेट अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते गरजेचे आहे. यासाठी भारतीय स्टेट बँकेची यावल शाखा सहकार्य करणार आहे. व्यवस्थापक गुजरे यांच्याशी चर्चा करून शाळानिहाय कॅम्प लावण्याची विनंती केली. त्यांनी होकार दिला आहे.
-शुक्राचार्य दुधाळ, प्रकल्प अधिकारी, यावल

विद्यार्थी असे
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा व्याप पूर्ण जिल्हाभर आहे. जिल्ह्यात एकूण 18 शासकीय आश्रमशाळा असून त्यात इयत्ता 1 ते 12वी मध्ये शिक्षण घेणारे 4 हजार 549 मुले व 2 हजार 660 मुली, असे 7 हजार 209 विद्यार्थी आहेत. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या सर्वांना बँक खाते उघडणे गरजेचे आहे.