आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमांचे उल्लंघन करून ७० बालके दत्तक दिल्याचे निष्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन जालना संचलित जळगाव येथील टाटिया शिशुगृहाने करार नियमांचे उल्लंघन करून ७० बालके दत्तक दिल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. लाखो रुपयांची देणगी घेऊन बाळाची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त बी.टी.पोखरकर यांनी दाेन दिवस तपासणी करून शिशुगृहाच्या अनागोंदी कारभाराचा पंचनामा केला. त्याचा अहवाल लवकरच आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
शहरातील टाटिया शिशुगृहातून तीन लाख रुपये घेऊन बाळ विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप सोनल पाटील नथ्थू पाटील या दांपत्याने केला होता. हे शिशुगृह चालवत असलेले जालना येथील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका यांची बाळ दत्तक देण्यासाठी तीन लाख रुपये मागतानाचा व्हिडिओ क्लिपमधील खळबळजनक संवाद “दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केला होता. त्यानुषंगाने बालकल्याण समितीने या शिशुगृहाची तपासणी करून महिला बालकल्याण आयुक्तांना कारवाई करण्याबाबत पत्र पाठवले होते. शिशुगृहातून १२ बालके करार नियमांचा भंग करून दिल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले होते. जिल्हा बालकल्याण समितीच्या पत्राची तातडीने दखल घेत महिला बालकल्याण आयुक्तांनी उपायुक्त बी.टी.पोखरकर यांची तपासणीसाठी नेमणूक केली. उपायुक्त पोखरकर यांनी बुधवार गुरुवारी असे दोन दिवस टाटिया शिशुगृहाची तपासणी केली. गुरुवारी त्यांनी शिशुगृहाचे दप्तर ताब्यात घेत महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी केली.
उपायुक्तांनी स्थापनेपासून ते आतापर्यंतचे दप्तर तपासल्यानंतर करार नियमावलीचे उल्लंघन करून शिशुगृहाने ७० बालके दत्तक दिल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिशुगृहात आलेले बालके मृत झाल्याचेही उपायुक्त पोखरकर यांना तपासणीमध्ये आढळून आले. सर्व मुले हॉस्पिटलमध्ये मृत झालेली आहेत. मात्र, किती मुले मृत झाली? हे सांगण्यास उपायुक्तांनी नकार दिला.
बालकांची ऑनलाइन नोंदणीच नाही
^नियमानुसार संकेतस्थळावर शिशुगृहाने नोंदणी करणे आवश्यक होते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर होमस्टडी करण्यात येतो. त्यानंतर शिशुगृह बालके दत्तक देण्याबाबत ठरवू शकते. हे नियमच शिशुगृहाने पाळलेले नाहीत. याप्रकरणी तपासणी अहवाल तयार केला असून दोन दिवसांत आयुक्तांना सादर केला जाणार आहे. बी.टी. पोखरकर, उपायुक्त, महिला बालकल्याण विभाग
बातम्या आणखी आहेत...