आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aeroplane Sign Of Election Not Available In Jalgaon Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान चिन्ह ‘उडाल्या’ने प्रचार साहित्यविक्रेत्यांची गोची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीच्या प्रचारयुद्धासाठी लागणारे साहित्य शहरात उपलब्ध झाले आहे. पण त्यास अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. विमान चिन्ह निवडणुकीतून गायब झाल्याने साहित्य विक्रेत्यांना पर्यायी चिन्हाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप अर्ज दाखल करण्यासाठी फारसा प्रतिसाद नाही. पक्षांनी उमेदवारांची निश्चिती न केल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे चित्र अधांतरीच आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून सोमवार आणि मंगळवार या शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल होणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचार साहित्य खरेदीसाठी पुढे कुणीच येत नसल्याचे दिसून येते. मात्र, शहरात प्रचार साहित्य विक्रीसाठी एक दुकान लागले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही टॉवर चौक परिसरात तीन-चार दुकाने लागण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातील काही व्यापार्‍यांनी जागेची पाहणीदेखील केली आहे.

बिल्ल्यांवर लावणार स्टिकर
दिल्ली, अहमदाबाद, मुंबई येथून प्रचाराचे साहित्य आणले आहे. रेडिमेड असल्याने विक्रेत्यांना विकण्याचेच काम आहे. शिवकाशी येथील फटाका फॅक्टरीतून प्लास्टिकचे बिल्ले आणले आहेत. त्यावर मागणीप्रमाणे पक्षांचे स्टिकर लावण्याचे काम येथे केले जाणार आहे. स्थानिकपेक्षा बाहेरील व्यावसायिक साहित्य विक्रीसाठी इच्छुक असल्याचे जाणकारांनी सांगितले.

पर्यायी चिन्ह द्यावे लागणार
पालिका निवडणुकीतून विमान चिन्ह हद्दपार झाल्याचा फटका विक्रेत्यांना बसणार आहे. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात विमान या चिन्हाची मागणी असते. येथेही खान्देश विकास आघाडीचे चिन्ह विमान असल्याने विक्रेत्यांनी या चिन्हाचा माल यापूर्वीच भरला आहे. आता तो त्यांच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळे पर्यायी जे चिन्ह मिळेल ते दोन दिवसात उपलब्ध करून देण्याची तयारी विक्रेत्यांनी दर्शवली आहे.

साहित्य खरेदीसाठी कार्यालयांकडून अद्याप प्रतिसाद नाही. मोठय़ा पक्षांना वरिष्ठ पातळीवरून साहित्याचा पुरवठा केला जातो. सोमवार-मंगळवारपासून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल जैन, विक्रेता, प्रचार साहित्य

डेमो बॅलेट मशीनही विक्रीला
बॅलेट मशीनबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी डेमो बॅलेट मशीनही विक्रीसाठी आले आहेत. यातून कोणत्या रकान्यातील बटन दाबायचे आणि लाइट लागल्यानंतर मतदान झाले असे गृहित धरायचे, अशी माहिती उमेदवारांकडून देण्यात येते. ही व्यवस्था डेमो मशीनवर केली आहे.

चिन्ह, बटणही उपलब्ध
प्रचारासाठी झेंडे, मफलर, टोप्या, बिल्ले, बटण, पक्षांचे चिन्हे असे साहित्य उपलब्ध आहे. हायटेक प्रचार यंत्रणेमुळे पक्षांची चिन्हे आणि नेत्यांचे फोटो असलेली प्रिंटेंड टोपी, मफलर आणि बिल्लयांचा वापर करून वातावरण निर्मिती केली जाते. या सर्व वस्तू शेकड्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या शर्टाला लावले जाणारे पक्ष चिन्हाच्या बटणास प्रतिसाद आहे.