आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Five Years Woman Come From Pakistan To Chalisgaon

गोष्‍ट तिची: चाळीसगावची महिला पाकिस्तानातून पाच वर्षांनी परतली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेली पन्नाशीतील महिला पाकिस्तानात पोहोचली आणि तब्बल पाच वर्षांनी ती पुन्हा आपल्या घरी पोलिसांच्या मदतीने सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली. गेली पाच वर्षे बेपत्ता आई परतल्याचा आनंद तिच्या संजय व मोतीलाल या दोन्ही मुलांनी आईला घट्ट मिठी मारून व्यक्त केला. चाळीसगाव तालुक्यातील वलठाण या खेड्यातील सीताबाई लक्ष्मण सोनवणे (50) या महिलेची ही कहाणी आहे.


सीताबाई मनोरुग्ण असल्याने तिच्यावर उपचार केले गेले; मात्र कोणतीच सुधारणा झाली नाही. अशाच अवस्थेत सन 2008मध्ये कुणालाही न सांगता ती निघून गेली. अशिक्षित व आर्थिक विपन्नावस्थेतील सोनवणे कुटुंबीयांनी विशेषत: तिच्या दोन्ही मुलांनी तिचा विविध ठिकाणी जाऊन शोध घेतला; मात्र पदरी निराशाच पडली. अखेर नातेवाईक सीताबाईला मयत समजून विसरूनही गेले. ती बेपत्ता झाली याचीदेखील कुठेच नोंद केली गेली नव्हती. मनोरुग्ण अवस्थेतच भटकत-भटकत ती पाकिस्तानात कशी पोहोचली? याची पूर्ण माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाली नाही.


सीमारेषा ओलांडल्यामुळे तिला पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला शिक्षाही भोगावी लागली. शिक्षा भोगत असताना पाकिस्तानात तिच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. त्यामुळे काही प्रमाणात तिला आठवायला लागल्याने तिने गाव, तालुक्याचे नाव सांगितले.


शिक्षेदरम्यान योग्य वैद्यकीय उपचार झाल्याने आठवणी जिवंत झाल्या. घरची, गावाची, मुलांची आठवण येत होती. मात्र, हिंदी भाषा येत नसल्याने पाकिस्तानी पोलिस अधिका-यांना काहीच कळत नव्हते. मात्र, चाळीसगाव या नावाच्या आधारे त्यांनी भारतीय दूतावास तसेच इमिग्रेशन विभागाला या महिलेसंदर्भात माहिती कळवली गेली. पाकिस्तान सरकारने महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन भारताकडे केले. महिलेचा फोटो व काही कागदपत्रांच्या मदतीने ही माहिती चाळीसगाव पोलिसांपर्यंत पोहोचवली. चाळीसगावचे पोलिस पथक वाघा बॉर्डरपर्यंत गेले. इंटरनॅशनल चेक पोस्ट, इमिग्रेशन विभाग, अमृतसरची रेड क्रॉस संस्था, स्थानिक प्रशासनाने खात्री केल्यानंतर सीताबाईला चाळीसगावहून आलेल्या पोलिस पथकाच्या स्वाधीन केले. या पथकासोबत सीताबाईचा धाकटा मुलगा संजयदेखील अमृतसरला गेलेला होता.


अन् संजयला मारली मिठी
अमृतसर येथे पोलिस पथकासोबत गेलेल्या संजयला बघून सीताबाईने आनंदाश्रू ढाळत आपल्या मुलाला घट्ट मिठी मारत त्यास गोंजारले, असे पथकातील पोलिस उपनिरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी पोलिस पथक, संजय व सीताबाई चाळीसगावात पोहोचले. तेथे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी साडीचोळी देऊन सीताबाईचे स्वागत केले.


भारतीय कैद्यांचे
जीवन हलाखीत

पाकिस्तानी तुरुंगात अद्याप 436 भारतीय मच्छीमार व सीमा ओलांडून आलेले दहा कैदी आहेत. त्यातील सात जणांना सोडले, परंतु तेथे तुरुंगात त्यांना नियमानुसार भोजन दिले जात नाही. त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतेक कैदी आजारी पडले आहेत. भारतीय कैद्यांना पाक कारागृहात हलाखीत दिवस काढावे लागतात.
सीताबाई सोनवणे


पोलिस पथकाचा प्रवास
० 7 जुलैला अमृतसरला रवाना
० 9 जुलैला आयसीपी केंद्र (इंटरनॅशनल चेक पोस्ट) येथे दाखल
० सायंकाळी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण
० 10 जुलैला अमृतसरहून चाळीसगावकडे रवाना