आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Railway Accident : All Railway Officer Wondering

रेल्वे अपघातानंतर : भुसावळ रेल्वेच्या पाच सायरननी उडवली सर्वच अधिका-यांची झोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नाशिकजवळील घोटी रेल्वेस्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसला गंभीर अपघात झाल्याची माहिती भुसावळ विभाग कंट्रोल रूमला मिळताच धोक्याची सूचना देणारे ‘सायरन’ 6.33 वाजले. सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या अधिका-यांची एकच धावपळ उडाली. अवघ्या 10 मिनिटांत तयार होऊन डीआरएम महेशकुमार गुप्ता यांच्यासह अधिका-यांची विशेष गाडी महाबली क्रेनसह नाशिककडे रवाना झाली.
रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा 24 तास सज्ज असते. त्यात वैद्यकीय सेवा, ब्रेकडाऊन क्रेन आणि कर्मचारी हे सदैव दक्ष राहत असतात. विभागात रेल्वेचा अपघात झाल्यावर डीआरएम यांना माहिती दिल्यावर तत्काळ रेल्वेचे सायरन वाजू लागतात. त्यामुळे घरात असलेल्या वरिष्ठ अधिका-यांना आणि संबंधित कर्मचा-यांना अपघाताची जाणीव होत असते. शुक्रवारी सुद्धा घोटीजवळ अपघात झाला, त्यावेळी रेल्वेचे अनेक अधिकारी सकाळी मॉर्निंग वॉक करीत होते. सायरन वाजताच सर्वच अधिका-यांची तारांबळ उडाली. ज्यांच्याजवळ मोबाइल होते त्यांनी तत्काळ कंट्रोल रूमशी संपर्क साधून अपघाताची माहिती जाणून घेतली.
असे होतात सायरन
भुसावळ विभागात जर मेल, एक्स्प्रेस या गाड्यांना अपघात झाला, तर 45 सेकंदात 5 सायरन वाजतात. त्यानंतर तीन मिनिटांच्या अंतरात पुन्हा 45 सेकंदात 5 सायरन वाजतात. मालगाडीला जर अपघात झाला तर चार सायरन वाजवले जातात. जर भुसावळ यार्डात मालगाडीला अपघात झाला असेल तर तीन सायरन वाजवले जातात.
15 मिनिटांत सुटते गाडी
अपघात झाल्यापासून 45 सेकंदात 5 असे दोन वेळा सायरन वाजवल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत भुसावळमधून अ‍ॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन भुसावळ स्थानक सोडत असते. या गाडीत वैद्यकीय अधिकारी त्यांचे पथक, ब्रेक डाऊन पथक आणि जे अधिकारी आले असतील त्यांना ही विशेष ट्रेन घटनास्थळी घेऊन जात असते. अन्य अधिकारी राहिल्यास त्यांना घटनास्थळी जाण्यास अडचणी येत असल्याने ते अधिकारी सुद्धा 15 मिनिटांत रेल्वेस्थानक गाठत असतात. अपघात जर रात्री झाला तर 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटांचा कालावधी या पथकाला दिला जात असतो. शुक्रवारी घोटीजवळ अपघात घडल्याची माहिती मिळताच 6.33 वाजता सायरन वाजून सायरन वाजल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत डीआरएम महेशकुमार गुप्ता, वरिष्ठ रेल्वे सेफ्टी अधिकारी हरिराम, रेल्वे सुरक्षा बलाचे उपायुक्त ए.के. स्वामी, वैद्यकीय अधिकारी यांना घेऊन आपत्कालीन गाडी नाशिककडे रवाना झाली. ही गाडी विनाथांबा घटनास्थळी पोहोचली.
18 पासून चौकशी
घोटीजवळ झालेल्या अपघाताची रेल्वेच्या उच्च पातळीवरून चौकशी होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी (मुंबई) आणि भुसावळ विभागाचे अधिकारी हरिराम हे या अपघाताची चौकशी 18 व 19 नोव्हेंबर रोजी नाशिक येथेच करणार आहे.