आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Tambapura Disturbance People Migrate For Secure Place

तांबापुरा दंगलीनंतर सुरक्षित आश्रयासाठी लोकांचे स्थलांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-दोन दिवसांपासून सुरू असलेली संचारबंदी आणि दंगलीचे रौद्ररूप अनुभवणार्‍या तांबापूरवासीयांनी शुक्रवारी शहरातील आपल्या नातलगांकडे सुरक्षित आर्शयासाठी तात्पुरते स्थलांतर केले. दोन दिवस घरातून बाहेरही पडू न शकलेल्या दंगलग्रस्तांना शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड चणचण जाणवत होती.

तांबापुरा परिसरात बुधवारी रात्री 12 वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर थेट शुक्रवारी दुपारी 3 ते 5 या दोन तासांसाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि इतर कामांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. या दोन तासात नागरिकांनी तांबापुरातून शहरात इतरत्र आर्शय घेण्यालाच प्राधान्य दिले. दुचाकी, रिक्षा, सायकल आणि पायी चालत जाऊन दंगलग्रस्तांनी तांबापुराचा निरोप घेतला. पुन्हा कधी येणार? याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. मात्र, आपल्या हक्काच्या घरी लवकरच पुन्हा परतण्याची इच्छा त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. प्रत्येकाच्या मनात आपल्यासह कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार होता. त्यामुळेच काही दिवस तांबापुरापासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे दिसून आले. सायंकाळी 5 वाजता पुन्हा संचारबंदी सुरू झाली. शहरात पर्यायी रहिवासाची व्यवस्था नसलेल्या तांबापूरवासीयांनी दोन तासात पाणी भरणे, प्रातर्विधी, कपडे धुणे आणि किराणा मालाची खरेदी करणे ही काम करून दंगलखोरांना शिव्यांची लाखोली वाहत घरांची कवाडे बंद केली. पोलिसांकडून आलेल्या अहवालानुसार शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत संचारबंदी वाढवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे यांनी दिले आहेत.

19 जणांना केले न्यायालयात हजर
पोलिसांनी गुरुवारी जुम्माशहा बुलंदशहा, इम्रानशहा बाबाशहा, जाकीर इस्माईल, फातिम तडवी, बशीर तांबोळी, भैय्या हटकर, अर्जुन वतोरे, भगवान हटकर, विठ्ठल हटकर, नारायण हटकर, अर्जुन हटकर, सोनू हटकर, योगेश हटकर, भरत हटकर, समाधान हटकर, मुमताज पिंजारी, संतोबा गवळी, धनराज हटकर, शेख हमीद शेख रज्जाक या 19 संशयितांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पालकमंत्री सावकारेंनी घेतली माहिती
पालकमंत्री संजय सावकारे यांनी पोलीस यंत्रणेकडून दंगलग्रस्त भागाची माहिती घेतली. पद्मालय विर्शामगृहात झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याकडून पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी माजी आमदार गुलाबराव पाटील उपस्थित होते.