आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसा आड जळगावकरांना मिळणार पाणी; पुरेसा पाऊस पडेपर्यंत ह‍िच व्यवस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूर धरणातील पाणीसाठा कमी होत असून ‘डाऊन स्कीम’ कार्यान्वित झाल्यावरही जूनमध्ये प्रशासनाला पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे भाकीत ‘दिव्य मराठी’ने वर्तविले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत आहे, तो साठा पुरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून 10 जूनपासून जळगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.

पालिकेच्या सध्याच्या योजनेतून पाणी उचल केली जात असली तरी वाघूरची जलपातळी आठवडाभरात खालावल्यावर ‘डाऊन स्कीम’ची मदत घ्यावी लागणार आहे. जळगावकरांना शक्य असेपर्यंत दोन दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून प्रयत्नकरण्यात येत होते. मात्र, तांत्रिक र्मयादा लक्षात घेता पाणी कपातीची शक्यता आहे. एमआयडीसीकडून सध्या सात एमएलडी पाणी मिळत असून जादा पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळवण्यात यश आलेले नाही. ‘डाऊन स्कीम’च्या माध्यमातून प्रतिदिन 30 ते 32 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.


दोन दिवसांत फेर चाचणी
धरणाच्या पायथ्याशी कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘डाऊन स्कीम’ ची गेल्या महिन्यात चाचणी झाली आहे. पंप चालण्यात अडचण नसल्याचे या वेळी स्पष्ट झाले असले तरी बेसिनमध्ये 24 तासात पडणारे पाणी, त्याची उचल करण्याची क्षमता याबाबींची फेरचाचणी घ्यावी लागणार आहे. गुरुवारी याची तपासणी करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे.

थोड्या दिवसांचा प्रश्‍न
‘डाऊन स्कीम’मधून किती पाणी मिळणे शक्य आहे, याची चाचणी दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्नसुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल. मात्र काही दिवसांचाच हा प्रश्‍न राहील. नितीन बरडे, सभापती, पाणीपुरवठा