आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Development Issue At Sawada(bhusawal)

कमी खर्चात जास्त उत्पन्न, धना पिकामुळे वाढते जमिनीची सुपीकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा - जमिनीस सुपीकता, तर कमी खर्चात बळीराजाला बक्कळ नफा कमवून देणार्‍या धना या पिकाची सावद्यात पूर्वीपासून मोठय़ा क्षेत्रावर पेरणी होते. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावद्याला धना पिकामुळे नवीन ओळख मिळाली आहे. कारण इंदूर, बर्‍हाणपूर पाठोपाठ सावद्याचा धना व्यापार्‍यांप्रमाणेच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. यंदा 150 हेक्टरवर पेरणी झाली असून तब्बल 2200 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. या माध्यमातून सव्वा कोटीच्या आसपास उलाढाल होईल.

ज्वारी, सोयाबीन, उडीद, मुगावर दुबार म्हणून धना पीक घेतले जाते. पावसाळ्याच्या शेवटी जमिनीत बर्‍यापैकी ओलावा असतो. खरिपातील पीक निघाल्यानंतर धना पेरणीपूर्वी शेतात वखरटीच्या एक-दोन पाळ्या द्यावा लागतात. बहुतांश शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाण्यांचा वापर करतात. सुमारे 80 ते 90 रुपये किलोने स्थानिक बाजारात बियाणे उपलब्ध होते. हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. तर पेरणीवेळी हेक्टरी 100 किलो डीएपीचा वापर केल्यास पिकाची वाढ जोमाने होते. विशेष म्हणजे जमिनीतील ओलावा आणि सकाळचे दवबिंदू या पिकासाठी पोषक असले तरी एक-दोन पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पन्नात हमखास वाढ होते.
यंदा पोषक स्थिती
सुपीक जमीन आणि पोषक वातावरणामुळे काही महिन्यापासून परिसरात धना पेरणी वाढली. कृषी विभागाच्या प्राप्त माहितीनुसार यंदा 150 हेक्टरवर धना पेरणी झाला आहे. हेक्टरी 15 क्विंटल उत्पन्न गृहीत धरल्यास परिसरातून 2200 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.
फरक असा
इंदूरमध्ये मिळणारा धना आकाराने बारीक आणि रंगाने हिरवा असतो. या तुलनेत सावद्याचा धना भुरक्या रंगाचा आणि जाड असतो. विशेषत: इंदूरच्या धन्यापेक्षा खान्देशी धन्याची चव व सुगंध चांगला असल्याने मसाल्यामध्ये त्याचा जास्त वापर होतो.
वर्षभर होते मागणी
प्रत्येक प्रकारच्या मसाल्यांमध्ये धन्याचा वर्षभर वापर होतो. असे असले तरी अत्यंत कमी ठिकाणी हे पीक घेतले जाते. खासकरून मध्य प्रदेशातील इंदूर, बर्‍हाणपूर आणि जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील धना व्यापार्‍यांच्या पसंतीस उतरतो. यासाठी अनेक परप्रांतीय व्यापारी हंगामाच्या शेवटपर्यंत सावदा शहरात तळ ठोकून असतात.
अर्थकारण असे
धना पीक साधारणत: 100 दिवसांचे आहे. हे पीक घेतल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढून पुढील पिकांसाठी फायदेशीर ठरते. जमिनीची मशागत, पेरणी, मजुरीसह हेक्टरी 10 ते 15 हजार खर्च येतो. हेक्टरी मिळणारे उत्पन्न 15 ते 20 क्विंटल असते. गेल्या वर्षी धना 6 हजार रुपये क्विंटलने विक्री झाला. यानुषंगाने हेक्टरी 90 हजार उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता 75 ते 80 हजार रुपये नफा मिळतो.
अशी करा फवारणी
दुबार पीक असलेल्या धन्याची रावेर तालुक्यातील सावदा परिसरात सर्वाधिक पेरणी होते. पिकाला दह्या रोगापासून वाचवण्यासाठी 80 टक्के गंधक हेक्टरी 20 किलो याप्रमाणे दोन वेळा, तर हिरव्या माव्याला प्रतिबंध करण्यासाठी 10 मिली रोगर 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विजय भारंबे, तालुका कृषी अधिकारी