गारपिटीचा परिणाम । पावसामुळे शेतकर्यांच्या शेतमालाची झाली मोठी हानी
रब्बी हंगाम हाता-तोंडाशी आलेला असताना देशातल्या बहुतांश भागात झालेल्या बेमोसमी आणि गारांच्या पावसाने राज्यात शेतमालाची मोठी हानी केली आहे. त्याचा शेतकर्यांना तर मोठा आर्थिक फटका बसणारच आहे; पण शहरातही गहू आणि डाळींच्या किमती आतापासूनच मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्या आहेत.
रब्बीचा हंगाम समाधानकारक झाल्यामुळे यंदा शेतकरी तर समाधानी होताच; पण गहू, हरबर्याचे दर शहरातील मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येण्याची स्थिती होती. मात्र, वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात यासह देशातील इतर भागातही अवकाळी पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी गारपिटीचा फटका पिकांना बसला आहे.
मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब येथून महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गव्हाची आयात होते. तिथे गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्यामुळे नवीन माल येण्यापूर्वीच जळगावातील शिल्लक असलेल्या गहू आणि डाळींचे दर आठ दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. क्विंटलमागे सुमारे 350 ते 400 रुपयांची वाढ आताच झाली असून त्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
सध्याच्या नैसर्गिक प्रकोपानंतर मार्च अखेर धान्य बाजारात गहू, हरबरा व अन्य पिकांची आवक कमी होण्याची शक्यता धान्य व्यापार्यांकडून व्यक्त केली जाते आहे. तसे झाल्यास चांगल्या गव्हाचे दर सरासरी दोन हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे.