आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळ हरला अन् धंदा जिंकला..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: जिह्याचे भूषण ठरेल व क्रीडा क्षेत्राला ऊजिर्तावस्था येईल, असा गाजावाजा करून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुल म्हणजे नगरमधील काही बिल्डरांना व्यवसाय मिळवून देणारा उपक्रम ठरला आहे. तेथे बांधलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीतून ठेकेदारांचे भले झाले; पण कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही क्रीडा क्षेत्राला मात्र संकुलाचा काहीच उपयोग झालेला नाही. तेथील सर्व क्रीडासुविधांची दुरवस्था झाली आहे.
खेळाडूंसाठी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. खेळांपेक्षा हे संकुल शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणूनच उरले आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंची सोय होईल, या उद्देशाने या क्रीडा संकुलाची खासगीकरणातून उभारणी करण्यात आली. त्यात क्रिकेट स्टेडियमसह लॉन टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, डायव्हिंगसाठी खोल जलतरण तलाव, मोठा जलतरण तलाव करण्याचे ठरले होते. ही सर्व कामे करण्यात आली; पण ती अर्धवट आहेत. त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही. हे क्रीडा संकुल सुरुवातीपासूनच वादात अडकले आहे. हे संकुल उभारले गेले ते महापालिकेच्या जागेवर. मात्र, महापालिकेला यातून काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे महापालिकेचे त्याकडे लक्ष नाही. या वादात लाभ झाला तो ठेकेदारांचा. खेळ होवो न होवो, येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र जोरात सुरू आहेत. आतील मैदाने मात्र ओस पडली आहेत. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करता क्रीडा संकुल समिती येथे खेळण्यासाठी येणार्‍यांकडून जिझिया कराप्रमाणे भाडे वसूल करत आहे.
क्रिकेटच्या मैदानाची दुर्दशा
क्रीडा संकुल होण्याआधी येथे वाडिया पार्क क्रिकेट मैदान होते. तेथे दोन रणजी सामने, तर एकदा गौरव सामना झाला होता. त्यात सुनील गावसकर, कपिलदेव, करसन घावरी, दिलीप वेंगसरकर यासारखे राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते, असा लौकिक असलेल्या या मैदानाचे नंतर क्रीडा संकुलात रूपांतर झाले. मात्र, त्या दर्जाचा एकही सामना तेथे होऊ शकलेला नाही. या मैदानावर चांगली खेळपट्टी नाही. मैदानाची लांबी-रुंदी आंतरराष्ट्रीय मानांकापेक्षा जास्त आहे. रणजीपटू सुरेंद्र भावे व राजू भालेकर यांच्या मते हे अप्रतिम मैदान आहे. तारांकित सुविधा निर्माण केल्यास येथे आंतरराष्ट्रीय सामनेही होऊ शकतात. हे मैदान बीसीसीआयच्या ताब्यात दिले, तर ते त्याचे रूपांतर क्रिकेटच्या नंदनवनात करतील. सरकारी यंत्रणांना ते करणे शक्य नाही, असे नगरमधील दिग्गज खेळाडूंचे मत आहे. मात्र, या संकुल समितीतील कोणालाही तसे वाटत नाही, ही नगरच्या क्रीडा क्षेत्राची शोकांतिका आहे असे एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’शी बोलून दाखवले.
मैदानासाठी अन्यायकारक दर
साधी क्रिकेटची नेटप्रॅक्टिस करण्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये दर आहेत. मात्र, एकही सुविधा उपलब्ध नाही. अगदी खेळपट्टीही खेळाडूंनाच तयार करून घ्यावी लागते. पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये यासाठी फक्त एक हजार रुपये दर आहे. शिवाय तेथे टर्फ खेळपट्टी, माळी, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. नगरला खेळाडूंना घरून पाण्याच्या बाटल्या भरून आणाव्या लागतात. येथे स्वच्छतागृहांचीही वानवा आहे. त्यामुळे आडोशाला नैसर्गिक विधी उरकावे लागतात, अशी कैफियत खेळाडूंनी मांडली.