आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एबीसी एअरवेजला नाइट लॅण्डिंगची दिली परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव विमानतळ सुरू होण्यासंदर्भात आणखी एक प्रयत्न म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने बंगळुरू येथील ‘एबीसी एअरवेज’ या कंपनीला नाइट लॅण्डिंगला हिरवा कंदील दिला आहे. भविष्यातील विस्तारित विमानसेवेसाठी ही कंपनी जळगाव विमानतळाचा रात्रीच्या पार्किंगसाठी उपयोग करणार आहे. दरम्यान, पुढच्या प्रक्रियेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कंपनीचे सीएमडी राजेश इब्राहिम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. विमानतळ प्राधिकरणाने देखील याला दुजोरा दिला आहे.

पोटेन्शियलच्या दृष्टिकोनातून काही विमान कंपन्यांनी जळगाव विमानतळाची चाचपणी केली होती; मात्र प्रस्ताव, परवानगी, हॅँगर, वाढता खर्च यासारख्या तांत्रिक अडचणींवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव बारगळले होते. दरम्यान, सध्या बंगळुरू येथून मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा आदी ठिकाणी सेवा देणार्‍या ‘एबीसी एअरवेज’ या कंपनीने सेवेचा विस्तार करण्यासाठी प्राधिकरणाकडे जळगाव विमानतळाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार प्राधिकरणाने रात्रीच्या पार्किंगसाठी या कंपनीला परवानगी दिली आहे. तसेच त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याने त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो, यावर जळगावातील सेवेचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, देशभरातील इतर प्रस्तावित सेवांसाठी जळगाव विमानतळाचा रात्रीच्या मुक्कामासाठी उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून सविस्तर प्रस्ताव आल्यानंरच सेवेबाबत खुलासा होऊ शकणार आहे. प्राधिकरणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने आता कंपनी पुढची योजना आखणार आहे. त्यानंतर स्थानिक सेवेबाबत भूमिका स्पष्ट होईल.

कंपनीच्या भविष्यातील योजना
बंगळुरू येथील ‘एबीसी एअरवेज’ याच महिन्यात बंगळुरू ते भुवनेश्वर ही सेवा सुरू करत आहे. याशिवाय पुणे, गोवा, गुवाहाटी, अमृतसर, सुरत आदी ठिकाणीही प्रवासी सेवा सुरू करणार आहे. या विस्तारित सेवांसाठी कंपनीला नाइट पार्किंगची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने अद्ययावत जळगाव विमानतळ उपयोगी ठरू शकणार आहे.

प्राधिकरणाचा खर्च वाढला
दरम्यान, जळगाव विमानतळापासून काहीही उत्पन्न मिळत नसताना कार्यालयीन स्टाफचा पगार, वीजबिल याशिवाय शासकीय महसुलाचे अडीच कोटी रुपये प्राधिकरणाकडे थकले आहेत. उत्पन्नच मिळत नसल्याने प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच विमानतळाचे मेंटेनन्स नियमित असल्याने प्राधिकरणाचा खर्च वाढत आहे.

हँगरची गरज नाही
संबंधित कंपनीकडून दुसर्‍या विमानतळावर हॅँगरची गरज भागवली जात असल्याने सध्यातरी जळगाव विमानतळावर हॅँगरची तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. ही कंपनी हॅँगरशिवाय जळगाव विमानतळ वापरू शकते.