आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या मतदारसंघात अजित पवार फोडणार आपटबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे राजकीय द्वंद महाराष्ट्राला परिचित आहे. हा सामना विधानसभा निवडणुकीत अधिक रंगतदार होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. कारण विधानसभेसाठी राष्ट्रवादीने सुरू केलेल्या तयारीची जळगावच्या ग्रामीण भागातील सुरुवात खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून होत आहे. रविवारी उपमुख्यमंत्री पवार सावद्यात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजेरी लावणार असून, ते काय बोलतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रावेर तालुक्यातील सावदा, निंभोरा, ऐनपूर व खिर्डी ही चार महसूल मंडळे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राला जोडण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून खडसेंना मोठी रसद मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला होता. शिवाय मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सावदा ही एकमेव पालिका असून राष्ट्रवादी काँग्रेस येथे तूल्यबळ पक्ष आहे. यावल आणि रावेर तालुक्यातील केळी बेल्टमध्ये सावदा शहराचे खास महत्त्व असल्याने येथूनच विधानसभेचा बिगुल वाजवण्याचे संकेत राष्ट्रवादीतून मिळाले होते. यानुशंगाने रविवारच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. या बैठकीत विधानसभेत विजय मिळवण्यासाठी ते कार्यकर्त्यांना काय टिप्स देतात, यापेक्षा विरोधी पक्षनेते खडसेंसंदर्भात काय बोलतात? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन, पणन संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

राजकीय खेळी ?
पवार यांच्या उपस्थितीत मेळावा म्हणजे मुक्ताईनगरात खडसेंची कोंडी करण्याची राष्ट्रवादीची रणनीती असल्याचे समोर येत आहे. शिवाय मुक्ताईनगरातून उमेदवार कोण? याविषयी चाचपणी होण्याची शक्यता आहे.

चार प्रबळ दावेदार
प्रतिष्ठेच्या मुक्ताईनगर मतदारसंघाने राष्ट्रवादीला नेहमीच हुलकावणी दिलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ यांच्यासह तालुकाध्यक्ष राजेश वानखेडे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.

मध्यवर्ती शहर
- रावेर, मुक्ताईनगर व यावलसाठी सावदा शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौ-याची मागणी होती.
राजेश वानखेडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस