आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar In Jalgaon For Vidhansabha Election Make Ready

जिल्हा राष्ट्रवादीवर ओढवली नामुष्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटनेची बांधणी आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जिल्हा दौ-यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा जिल्हा बॅँकेच्या सभागृहात घेण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली आहे. पवारांच्या दौ-यात शाही मेळाव्याच्या आयोजनाचे प्रायोजकत्व घेण्यासाठी एकही पदाधिकारी पुढे न आल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणा-या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व घेण्यापासून पक्षाचे पदाधिकारी लांब आहेत. त्यामुळे पक्षाच्या शाही मेळाव्यांना छेद देत पालकमंत्र्यांनी जिल्हा बॅँकेच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन केले असून, जळगावपाठोपाठ सावदा येथेही मेळावा होणार आहे. या ठिकाणी देखील साध्याच पद्धतीने मेळावा होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांची अडचण
मॅनेजमेंट टीममुळे देवकरांना अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे सोपे होते. त्याउलट पालकमंत्री संजय सावकारेंकडे जळगावात स्थानिक कार्यकर्त्यांची टीम नाही. ते भुसावळातील रहिवासी असल्याने कार्यक्रमात गैरसोय नको म्हणून त्यांनी जिल्हा बॅँकेच्या सभागृहाला पसंती दिली आहे.

देवकरांनी सुरू ठेवली परंपरा
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे दौरे, पक्षाचे कार्यक्रम, मेळावे आणि बैठकांच्या शाही आयोजनाची जबाबदारी यापूर्वी गुलाबराव देवकरांनी उचलली होती. त्यासाठी त्यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे पक्षाकडून कौतुकही करण्यात आले होते. मात्र, आता देवकर हे कारागृहात असल्याने अजित पवारांच्या दौ-यासाठी कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी आता इतर पदाधिका-यांवर आली आहे.

सभागृहात कार्यकर्ते बसणे अशक्य
जिल्हा बॅँकेच्या सभागृहाची आसनक्षमता एक हजारापेक्षाही कमी आहे. त्यामुळे पक्षाचा आवाका, विधानसभेतील इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांची संख्या पाहता या सभागृहात त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र, आयोजनाची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असल्याने इतर पदाधिका-यांनी थेट कार्यक्रमाला हजेरी लावण्याची भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांची फळी नसल्यामुळे याच सभागृहात मेळावा होणार आहे. मेळाव्यानंतर तालुका बैठकादेखील तेथेच होतील.