आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमेर एक्स्प्रेसचा भुसावळ जंक्शनला ‘खो’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सिकंदराबाद-अजमेर एक्स्प्रेस भुसावळ रेल्वेस्थानकावर न येता क्षेत्रिय प्रशिक्षण संस्थेपासून (भुसावळ बायपास) परस्पर निघून जाते. जिल्ह्यातील तिन्ही खासदार, हजारो प्रवाशी आणि ख्वॉजा गरीब नवाझ यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांना ठेंगा दाखवण्याचा हा प्रकार सातत्याने सुरूच आहे. यामुळे भुसावळसह परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ रेल्वेस्थानकावर दिवसभरात 120 गाड्या येतात आणि जातात. रेल्वेच्या आठ फलाटांवरून या गाड्या धावतात. दिवसभरातील या धामधूमीत सिकंदराबाद-अजमेर ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावते. अकोला येथून भुसावळात आलेली ही गाडी खंडव्याकडे रवाना होते. दरम्यान, ही गाडी भुसावळात येत असली तरी प्रत्यक्ष रेल्वेस्थानकावर मात्र येत नाही. आऊटरवरून ती झेडटीएस मार्गाने वळविली जाते. आठवड्यातून दोन दिवस हा प्रकार चालतो.
भुसावळ स्थानकावर सर्व सुविधा आहेत. त्यामुळे या स्थानकावरून जाणा-या बहुतांश गाड्या येथे 20 मिनिटांपर्यत थांबतात. या कालावधीत इंजिन बदलविणे, बोगीत पाणी भरणे, डब्यांची सफाई करणे आदी कामे केली जातात. 12719 व 12720 असे अप-डाऊन गाड्यांचे क्रमांक असलेली ही गाडी अजमेर येथून येताना इटारसीमार्गे येते.इटारसी रेल्वेस्थानक सोडल्यावर ती तलवाडी येथे 30 ते 50 मिनिटांचा थांबा घेते. भुसावळ मात्र स्थानकाच्या दोन किलोमीटरजवळून जात असतानाही स्थानकावर येत नाही. त्यामुळे भुसावळ स्थानकाला लांबूनच टाटा का? असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील भाविकांना पडला आहे. यासाठी जनआंदोलन होण्याची शक्यता आहे.
अधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का? - सिकंदराबाद-अजमेर ही गाडी भुसावळपर्यंत येते; पण रेल्वेस्थानकावर येत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. ज्या अधिका-यांनी ही गाडी भुसावळ रेल्वेस्थानकाऐवजी परस्पर वळविण्याचे आदेश दिले असतील त्या अधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ? हे तपासून पहावे लागेल. अजमेरला जाणा-या भाविकांची संख्या पाहता ही गाडी भुसावळ स्थानकावर येण्यासाठी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करू. प्रसंगी कार्यकर्त्यांना सोबत घेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल. - हरिभाऊ जावळे, खासदार, रावेर
भाविकांचा विचार करायलाच हवा - अजमेर येथे ख्वॉजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी ही गाडी भुसावळ स्थानकावरूनच सुटणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर करून झेडटीसीकडून जाणारी गाडी भुसावळ स्थानकापर्यंत आणावी आणि प्रवाशांना सुविधा द्यावी. कारण अजमेरला केवळ विभागातील मुस्लिमच नव्हे हजारो हिंदू भाविक सुद्धा दर्शनासाठी जातात. - अजीमोद्दिन रिझवी अ. रऊफ, इमाम, सुन्नी मशिद, भुसावळ
रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार - सिकंदराबाद -अजमेर एक्स्प्रेस भुसावळला थांबा मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी चर्चा करू. वेळ पडल्यास सभागृहात हा विषय लावून धरू. कुठल्याही स्थितीत ही गाडी भुसावळात थांबेल. आमची विनंतीची भाषा न कळाल्यास समजेल अशा भाषेत समज देवू.
ए. टी. पाटील, खासदार, जळगाव
खासदारांचे प्रयत्न - भुसावळ येथून मुंबईसाठी नव्याने एक्स्प्रेस, पॅसेंजर सुरू करण्याची मागणी पूर्ण होत नाही. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळून जाणारी अजमेर-सिकंदराबाद गाडी केवळ दोन किलोमीटर अंतर सोडून फलाटापर्यंत येऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील तिन्ही खासदारांनी रेल्वे बोेर्डाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रयत्न व्हावेत.