आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंप्राळा, मेहरूणमध्ये बारागाड्या; अक्षय्य तृतीयेनिमित्त भवानीमातेचा यात्रोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अक्षय्य तृतीयेनिमित्त पिंप्राळा व मेहरूणमध्ये बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले. अनेक वर्षांची परंपरा भाविकांनी कायम राखली.

शहरातील उपनगरातील भवानीदेवी मंदिर अहिर सुवर्णकार पंचमंडळ व ग्रामस्थांतर्फे पिंप्राळा यात्रोत्सवासह बारागाड्या ओढण्याचे यंदा 65 वे वर्ष असून अक्षयतृतीयेला परंपरेनुसार बारागाड्या ओढण्याचा मान भगत हिलाल भिल यांना मिळाला. तत्पूर्वी आदल्या दिवशी रात्री बारा वाजता मंदिरावर ध्वज फडकावण्यात आला.

पिंप्राळा रस्त्यावर भाविकांची गर्दी

दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी सायंकाळी भवानी मातेची पूजा केल्यानंतर महामार्गाजवळील रेल्वे उड्डाणपुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी भाविकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. पंचमंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव, पंडित सोनार, रामभाऊ सोनार, अशोक सोनार, प्रभाकर सोनार, मंदिराचे पुजारी सुरेश कुळकर्णी यांच्यासह नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.


मंदिरावर चढवला फुलोरा
सकाळी भवानी मंदिरावर फुलोरा चढवण्यात आला. दरम्यान, दरवर्षाप्रमाणे यंदाही यात्रोत्सवात लहान पाळणे आणि खाद्यपदार्थांच्या विक्री दुकाने लावण्यात आली होती. त्यामुळे परिसर गर्दीने गजबजून गेला. पिंप्राळा रेल्वेगेटपासून तलाठी कार्यालयापर्यंत भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.

मेहरूणमध्ये 83 वर्षांची परंपरा
मेहरूणमध्ये बारागाड्या ओढण्यासाठी भगत मधुकर वाघ यांना मान मिळाला. 1930 पासून बारागाड्या ओढण्याची परंपरा सुरू आहे. सायंकाळी परिसरातील र्शीराम, मारुती, भवानी मंदिराचे दर्शन घेऊन गाड्या ओढण्याला सुरुवात झाली. त्या भवानी मंदिरापर्यंत आणल्या.