आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणा-या समस्यांवर उपाय म्हणून टास्क फोर्स कमिटीने एआयसीटीई व यूजीसीला सायबर सिक्युरिटी कोर्स विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी आदेश दिले आहे. हा अभ्यासक्रम आतापर्यंत केवळ मॅनेजमेंट कोर्ससाठी होता. पुढील शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई आणि यूजीसीअंतर्गत सर्व टेक्निकल इन्स्टिट्यूट, विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समावेश होतील. मात्र, सायबर क्राइम विषय विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक ठेवले आहेत.

एआयसीटीईतर्फे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोमेट्रिक्स किंवा सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी आदी विषय शिकवण्यात येत आहेत. विषयांना पर्याय म्हणून टेक्निकल कॉलेजांमध्ये सहभागी करण्यास सांगण्यात आले आहे.

टास्क फोर्सकडून शिफारस
देशातील सर्वच महाविद्यालयांमध्ये सरसकट सायबर सिक्युरिटीचा विषय शिकविला जात नाही. केवळ एखाद्या खासगी संस्थाच या संदर्भात प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान, कॅबिनेट कमिटीतर्फे नॅशनल सिक्युरिटीला गांभीर्याने घेत टास्क फोर्स कमिटी तयार केली आहे. या कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार अभ्यासक्रमात हे विषय पर्यायी विषय म्हणून प्रस्तावित केले आहेत. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली तरी हे विषय सक्तीचे राहणार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना सायबर क्राइमचा अभ्यास करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

भविष्याची गरज
सायबर क्राइमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज आपल्याला या विषयाचे गांभीर्य वाटत नसले तरी नजीकच्या काळात सायबर क्राइमला अटकाव करण्यासाठी हे तंत्रज्ञान अवगत असलेल्यांची गरज भासणार आहे.
पंकज पवनीकर, आयटी तज्ज्ञ

यूजीसी वेबसाइट आता हिंदीतही
यूजीसीची नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यात हिंदी भाषेचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. होमपेजवर दाखवण्यात आलेल्या पर्यायांची निवड करून हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील माहिती उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे इंग्रजी येत नसलेल्या विद्यार्थ्यांनाही माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे.

आवश्यकता का भासली?
* देशात 80 कोटी मोबाइलधारक आहेत. यातील इंटरनेट वापरणा-या ंची संख्या 16 कोटी आहे. 33 टक्के मोबाइल ग्राहकांकडे इंटरनेट सुविधा आहे. या 33 टक्क्यांपैकी 40 टक्के ग्राहक मोबाइल इंटरनेटचा वापर करत असून त्यांना सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात गांभीर्य असणे गरजेचे आहे.
* एससीआरबीच्या आकडेवारीनुसार देशातील सायबर क्राइमच्या घटना वाढत आहेत. याचे कुठलेही ठोस कारण सांगता येत नसले तरी महत्त्वाच्या कॉलेजमध्ये सायबर क्राइमसंदर्भातील विषयांचे गांभीर्य नसल्याचे एक कारण आहे.
* नायजेरियन फसवेगिरी (लॉटरी वगैरे), वायफाय हॅकिंग, वेब हॅकिंग या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणांमध्ये सायबर तांत्रिक माहिती ठेवणा-या ंव्यतिरिक्त इतरांना बेसिक भाषादेखील माहीत नसते. त्यामुळे ई-मेल हॅक होतात.
* मोबाइल फसवेगिरीच्या घटना वाढत आहेत. एखाद्या नंबरवरून लॉटरी, लकी ड्रॉ लागण्यासंदर्भातील मेसेजेस आल्यानंतर फोन कॉल येणेच बंद होण्याचे प्रकार होतात. सायबर सुरक्षेची मूलभूत माहिती या प्रकारापासून संरक्षण करण्यास मार्गदर्शक ठरेल.